धाराशिव (प्रतिनिधी)- परदेशातून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात होत असल्याने देशांतर्गत तेलबियांना अपेक्षित भाव मिळत नव्हता. ही बाब ध्यानात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे कच्च्या तेलाच्या आयातीवर शुल्क लावण्यात यावा यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार धोरणात्मक निर्णय घेत केंद्र सरकारने कच्च्या तेलाच्या खरेदीवर आयात शुल्क लागू केले आहे. त्यामुळे आता देशातील तेलबियांच्या खरेदीला वेग येईल. आणि सोयाबीनचे दर निश्चितच वाढ होईल  असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

यंदाच्या हंगामात सोयाबीनला अधिकचा भाव मिळावा, यासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच आपण आग्रही प्रयत्न सुरू केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याबाबत सतत सकारात्मक चर्चाही केली. राज्य सरकार सोयाबीनच्या भावाबाबत गंभीर असून केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करायला हवा यासाठी आग्रह धरला. त्यानुसार उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आपल्या मागणीनुसार केंद्रात हा मुद्दा अधिक गांभीर्याने पुढे केला. त्याला आता यश आले आहे. लवकरच सोयाबीन खरेदीला वेग येईल आणि आपण केलेल्या पाठपुराव्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

सोयाबीनच्या कमी दराबाबत सरकारने यापूर्वीच दिलगिरी व्यक्त केली आहे. अनुदानाच्या माध्यमातून काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा देण्याची काम आपल्या सरकारने तातडीने हाती घेतले. आगामी हंगामातही केंद्र सरकारच्या धोरणाबाबत योग्य ती खबरदारी घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रीय मंत्र्यांशी बोलले आहेत. सोयाबीनचा दर वाढीच्या प्रयत्नाला नजीकच्या काही दिवसातच यश येईल असेही आमदार पाटील यांनी सांगितले. बारदान्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सोयाबीन खरेदी संथ गतीने सुरू आहे. त्यावर तोडगा काढला आहे. बारदाना खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या शुक्रवारपासून बारदाना खरेदीही लवकरच सुरू होईल. त्यानंतर सोयाबीन खरेदीचा वेग वाढेल व उत्पादकांना अधिकचा भाव नक्की मिळेल असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

 
Top