धाराशिव (प्रतिनिधी)- भूम तालुक्यात काही भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदी,नाले,ओढे हे भरून वाहत आहेत. सोयाबीन,उडीद या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन त्यांना तात्काळ मदत मिळावी असे निवेदन डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व  कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहे.

भूम परंडा तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे  शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावून घेतला आहे. सोयाबीन हे पीक काढणीला आलेले होते. त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन या पिकाची काढणी देखील केली होती. त्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नदीला पाणी आल्यामुळे त्या शेतकऱ्यांना सोयाबीन शेतात नजरेसमोर दिसत असून देखील वाहून नेता येत नाहीत. अशा सर्व नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी असेही या निवेदनात म्हटले आहे.


 
Top