मुरूम (प्रतिनिधी)- संत निरंकारी मिशन मुख्यतः मानवता, विश्वबंधुत्व आणि अध्यात्मिक जागरूकता यावर भर देते. यांचा मुख्य ध्यास म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ईश्वराची प्रत्यक्ष जाणीव करून देणे. ईश्वर हा सर्वत्र असून आपल्याला त्याचे ज्ञान होणे अत्यावश्यक आहे. मानवजात एकच असून सर्वांमध्ये एकसमानता आहे. जात, धर्म, वर्ग या सर्व भेदभावांपासून दूर राहून एकमेकांशी प्रेम व आदराने वागावे. असे प्रतिपादन निरंकारी मिशन सोलापूरचे क्षेत्रिय संचालक बाळासाहेब पवार यांनी केले.
सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने मुरूम ता. उमरगा येथे मुरूम व नळदुर्ग ब्रँचच्या संयुक्त विद्यमाने सेवादल प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी मुरूम ब्रँच मुखी दयानंद साखरे, नळदुर्ग ब्रँच मुखी सुनिल पिस्के उपस्थित होते. सदर प्रशिक्षण यशस्वी करण्याकरिता सेवादल इन्चार्ज बिरू बंदीछोडे, रोहित विभुते यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा मोटे यांनी केले. दोन्ही युनिटमधील सेवादल महापुरुष व बहिणजी बहुसंख्येने उपस्थित होत्या.