धाराशिव (प्रतिनिधी)- वाशी पोलीस ठाण्याचे पथक दि.05.09.2024 रोजी 13.00 वा. सु. वाशी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकास वाशी तालुक्यातील एनएच 52 रोडवर इंदापूर फाट्याजवळ रस्त्यावरुन अवैध कत्तलीतील गोवंशीय मांसाची वाहतुक होणार असल्याची गोपनीय खबर मिळाली होती. यावर वाशी पोलिस ठाण्याच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान एनएच 52 रोडवर इंदापूर फाट्याजवळ येथुन जाणारा पिकअप क्र. एम.एच. 16 वाय 3213 हा पोलीसांनी संशयावरून थांबवून त्याच्या हौद्यात डोकावून पाहिले. आत गोवंशीय मांस व बर्फाचे तुकडे दिसून आले. यावर पोलीसांनी नमूद पिकअपचा चालक सलमान हरुण मनियार, वय 34 वर्षे, सय्यद राजम्महम्मद आरीफ, वय 38 वर्षे, दोघे रा. संगमनेर ता. संगमनेर जि. अहमदनगर यांना त्या मांस वाहतुक परवाण्याबाबत विचारले असता परवाना नसल्याचे त्यांनी सांगीतले. यावर पथकाने अंदाजे 3 लाख रूपये किंमतीच्या नमूद पिकअपसह त्यातील अंदाजे 1 लाख 25 हजार रूपये कमतीचे सुमारे 1,250 किलो गोवंशीय मांस जप्त केले. प्रयोगशाळा परिक्षणाकरीता पशुधन विकास अधिकारी, वाशी यांच्यामार्फत मांसाचे नमूने काढले आहेत. तसेच जप्त मांस हा नाशवंत पदार्थ असल्याने तात्काळ नष्ट करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वाशी यांच्याकडे विनंती पत्र पाठवले असून त्यांची संमती मिळताच तो मांस साठा नष्ट केला जाणार आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजु लाटे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5 (क),9(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलिस ठाण्याचेे प्रभारी गायकवाड, पोउपनि घुले, पोना लाटे यांच्या पथकाने केली आहे.