धाराशिव (प्रतिनिधी)- बेंबळी पोलीस ठाण्याचे पथक बेंबळी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकास धाराशिव तालुक्यातील धुत्ता पाटी येथील रस्त्यावरुन अवैध कत्तलीतील गोवंशीय मांसाची वाहतुक होणार असल्याची गोपनीय खबर मिळाली होती. यावर बेंबळी पोलिस ठाण्याच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान धुत्ता पाटी येथुन जाणारा आयशर टेम्पो क्र. एम.एच. 11 एएल 3159 हा पोलीसांनी संशयावरून थांबवून त्याच्या हौद्यात डोकावून पाहिले. आत गोवंशीय मांस व बर्फाचे तुकडे दिसून आले. यावर पोलीसांनी नमूद टेम्पोचा चालक रफीक पैगंबर पठाण, वय 28 वर्षे रा.कुंभारी, ता. द.सोलापूर जि. सोलापूर यास त्या मांस वाहतुक परवाण्याबाबत विचारले. परवाना नसल्याचे त्यांनी सांगीतले. यावर पथकाने अंदाजे 10 लाख रूपये किंमतीच्या टेम्पोसह त्यातील अंदाजे 4 लाख 80 हजार रूपये किंमतीचे सुमारे 4 मेट्रीक टन गोवंशीय मांस जप्त केले. प्रयोगशाळा परिक्षणाकरीता पशुधन विकास अधिकारी, बेंबळी डॉ. श्री. कालीदास सुतार यांच्यामार्फत मांसाचे नमूने काढले आहेत. तसेच जप्त मांस हा नाशवंत पदार्थ असल्याने तात्काळ नष्ट करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, धाराशिव यांच्याकडे विनंती पत्र पाठवले असून त्यांची संमती मिळताच तो मांस साठा नष्ट केला जाणार आहे. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गोपाळ सोमवंशी यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5 (क),9(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली बेंबळी पोलिस ठाण्याचे प्रभारी पाटील, पोह कोळेकर, पोना जगताप, गोपळ सोमवंशी, पवार यांच्या पथकाने केली आहे.  

 
Top