धाराशिव (प्रतिनिधी) - वृक्ष लागवड करणे व लावलेल्या सर्व वृक्षांचे जतन करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. सर्वत्र वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते मात्र ती जतन होतात किंवा नाही याकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब पर्यावरणासाठी अतिशय धोक्याची असल्यामुळे धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून धाराशिव तालुक्यातील वडगाव (सि) येथील सिद्धेश्वर मंदिरालगत 10 एकर क्षेत्रांवर 3 हजार विविध देशी प्रजातींच्या 10 हजार वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. त्या रोपांचे जतन संगोपन करण्यासाठी ठिबक बसविण्यात आले असून यापैकी एक देखील वृक्ष जळणार नाही. तर लावलेल्या सर्व झाडांचे संगोपन नक्की होणार आहे. त्यामुळे वृक्षारोपण करून लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची चळवळ सर्वत्र वाढली पाहिजे असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी दि.29 सप्टेंबर रोजी केले.
धाराशिव तालुक्यातील वडगाव (सि) येथील सिद्धेश्वर मंदिरालगत असलेल्या ओसाड जागेवर देशी असलेल्या 3 हजार प्रजातींच्या 10 हजार वृक्षांचे धाराशिव शहर व परिसरातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, पुणे येथील वनश्री पुरस्कार प्राप्त देवराई फाउंडेशनचे रघुनाथ ढोले, लालासाहेब माने, नांदेड येथील ऋत फाऊंडेशनचे नांदेड शिवशंकर चापुले, पिंपरी चिंचवड येथील आरटीओ इन्स्पेक्टर प्रकाश मुळे, पुणे येथील निसर्ग राजा मित्र जीवांचे राहुल घोलप, सुहास कडू, सुधाकर चव्हाण, एम.डी. देशमुख, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, वृक्षांचे मार्गदर्शक ढोले उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, गेल्या वर्षापासून वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात येत होते. कारण लावलेली वृक्ष जगावीत तसेच नागरिकांना देशी व औषधीं गुणधर्म असलेल्या वनस्पतींची ओळख होऊन ती जोपासता यावीत याकडे विशेष लक्ष दिले गेले. तर जमिनीचे सपाटीकरण करून अंतर्गत रस्ते झाडे लावण्यासाठी त्याची आखणी करण्यात आली. यामध्ये पिंपळ, चिंच, आवळा, फणस, जांभूळ, वड, करंजीसह सर्व जाती धर्मात पवित्र असलेल्या वृक्षांसह 3 हजार विविध प्रजातींचा समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. वृक्ष लागवड दरवर्षी मोठ्या प्रमाणात सर्वत्र केली जाते. मात्र लावलेली ती झाडे पुढे जळाली की वाढली ? याकडे कोणीच लक्ष देत नाही. वृक्षतोडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून लागवड करून ती जतन करण्याचे प्रमाण घटत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून ती जतन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की, सर्वात वृक्ष लागवड कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये राज्यात लातूर नंतर धाराशिवचाच नंबर लागतो. त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावून ती जगविली पाहिजेत. झाडे लागवड करून ती मोठी झाल्यानंतर त्याकडे पाहिल्यानंतर जे समाधान लाभते, ते पैशात किंवा इतर कुठल्या संपत्तीत मोजता येत नसल्याचे त्यांनी नमूद केले. आज लावण्यात आलेल्या 10 हजार वृक्षापैकी एकही पक्ष जळणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊन नियोजन केलेले आहे. त्यासाठी ठिबकद्वारे पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. वृक्ष लागवड करण्यासाठी धाराशिव शहरातील नागरिक, मंदिर संस्थांचे ट्रस्टी, विद्यार्थी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार महेश पोतदार यांनी मानले.
या लागवडीत आयुर्वेदिक वृक्ष गार्डन, बॉटनिकल वृक्ष गार्डन, प्लॉवर्स गार्डन, अन्नपुर्णा फ्रुटस गार्डन, नक्षत्र वृक्ष गार्डन, ग्रास, रुट गार्डन, धर्म गार्डन (सर्व धर्मातील पवित्र वृक्ष), दुर्मिळ वृक्ष गार्ड, डेन्स फॉरेस्ट, तिर्थणकर वृक्ष गार्डन, राज्य वृक्ष गार्डन, इसापुर राजा गार्डन, ध्यानकेंद्र, व्युव पॉईट व पाक्षी पानवठा अशा वेगवेगळया गार्डनसह पक्षी वानवठाही केला आहे.