धाराशिव (प्रतिनिधी)- माता भगिनींना सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने अनेक महत्वाच्या योजना हाती घेतल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही त्यातीलच एक महत्वपूर्ण योजना आहे. राज्यातील कोट्यावधी माता भगिनींना त्याचा लाभ होत आहे. योजना यशस्वी ठरत असल्याने साहजिकच विरोधकांच्या पोटात दुखत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेला विरोध करणारांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जागा दाखवून द्यावे, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

‌‘स्त्रीशक्तीचा सन्मान आणि मातृशक्तीला आधार' या संकल्पांतर्गत नळदुर्ग येथे अंबाबाई मंदिर सभागृहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी माता भगिनींसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण महिला बचत गटाच्या मीरा महाबोले व भाग्यलक्ष्मी बचत गटाच्या जिजाबाई जाधव उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि अर्चनाताई पाटील यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तुळजाभवानी देवी, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. उपस्थित हजारो महिलांच्यावतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील व अर्चनाताई पाटील यांचा यावेळी भव्य सत्कारही करण्यात आला.

आपल्या परिसरातील 10 हजार मुला-मुलींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे सांगत नळदुर्ग आणि परिसरात केलेल्या आणि होऊ घातलेल्या अनेक महत्वपूर्ण कामांबाबत आमदार पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले. नळदुर्ग शहरात पाच एकर जागेवर भव्य व राज्यातील क्र. 1 ची बसवसृष्टी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 5 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. त्याचबरोबर हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे स्मारकही उभारण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा दैदिप्यमान इतिहास आणि त्यावेळी हौतात्म्य दिलेल्या शहिदांचा सन्मान राखण्यासाठी भव्य असे मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारकही साकारले जाणार आहे. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी शहिद झालेले, पंजाबचे भूमिपुत्र असलेले शहिद बचित्तर सिंग यांच्या कार्याची महती या स्मारकाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.मुस्लिम समाजासाठी भव्य शादिखाना,बौद्ध समाजासाठी सभागृह यासह नळदुर्गच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात आणखी विकासकामे प्रस्तावित आहेत. राज्यभरातून तसेच देशातून अधिकाधिक पर्यटक येथे कसे येतील, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत या सर्व कामांच्या माध्यमातून नळदुर्ग शहर आणि परिसराचा चेहरामोहरा बदलून खऱ्या अर्थाने नळदुर्ग शहराचा विकास सिध्द करणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले.

नळदुर्ग शहरात लवकरच अप्पर तहसील कार्यालय सुरू होत आहे. पुढील काळात नळदुर्ग येथे स्वतंत्र तहसील कार्यालय आणि नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. महायुती सरकारने मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण, लखपती दिदि योजनेअंतर्गत एक लाखापर्यंतची मदत, बचत गटांंचे सक्षमीकरण, रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत कर्ज रकमेवर 35 टक्क्यापर्यत वाढीव अनुदान, अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर, अशा अनेक योजना मातृशक्तीला सक्षम करण्यासाठी सुरू केल्या आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीलाच मतदान करण्याचे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे.

यावेळी अर्चनाताई पाटील यांनीही शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती उपस्थित महिलांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माधुरी पद्माकर घोडके यांनी केले. अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते लाडक्या महिलांचा सन्मान म्हणून उपस्थित हजारो महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुशांत भूमकर, नय्यर जहागीरदार, रणजितसिंह ठाकूर, श्रमिक पोतदार, धीमाजी घुगे, गणेश मोर्डे, अक्षय भोई, सागर हजारे, बंडू पुदाले, पांडूरंग पुदाले, पद्माकर घोडके, सुनील बनसोडे, जमन ठाकूर यांच्यासह नळदुर्ग शहर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


यांचा करण्यात आला सन्मान

कर्यक्रमात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते कविता पुदाले, उद्योजक कल्पना गायकवाड, बचत गटाच्या मीराताई महाबोले, वैद्यकिय सेवा देणाऱ्या डॉ. स्वाती पाटील, सामाजिक कार्यकर्त्या शाहेदाबी सय्यद, अक्षरवेलच्या अध्यक्ष शिल्पा पुदाले, जलतरणपटू अश्वेता गायकवाड यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

 
Top