धाराशिव (प्रतिनिधी)- नळदुर्ग तालुका निर्मितीच्या दिशेने पाहिले महत्त्वाचे पाऊल पडले आहे. अनेक दशकांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. तालुका निर्मितीच्या अनुषंगाने नवीन अप्पर तहसील कार्यालयाच्या प्रस्तावास बुधवारी राज्य सरकारच्या उच्चस्तरीय सचिव समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे नळदुर्गवासीयांच्या स्वतंत्र तालुक्याच्या मागणीला न्याय मिळण्यास सुरुवात झाली आहे. आता लवकरच या कार्यालयाचे कार्यक्षेत्र व पद निर्मितीचा शासन निर्णय निर्गमित होणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
नळदुर्गच्या या प्रस्तावस तत्कालीन ठाकरे सरकारने सहकार्य केले न्हवते परंतु महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने हा प्रस्ताव पुन्हा सादर केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावास वित्त विभागाची मान्यता दिली आणि गौरी गणपतीच्या शुभ मुहूर्तावर नळदुर्ग येथे अपर तहसील कार्यालयाच्या प्रस्तावास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता मिळाली आहे. स्वतंत्र तालुका निर्मितीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहर तथा अणदूर, जळकोट, नंदगाव व शहापूर या महसुली मंडळातील नागरिकांची अनेक दशकांपासूनची स्वतंत्र नळदुर्ग तालुका निर्मितीची मागणी होती. तुळजापूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र व गावांची संख्या विचारात घेवून नळदुर्ग येथे अतिरिक्त तहसील कार्यालय मंजूर करण्याच्या मागणीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता.
राज्यात नवीन जिल्हे व नळदुर्गसह इतर तालुके निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्यासाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची गरज असल्यामुळे या प्रस्तावांना विलंब होत आहे. नागरिकांची गरज ध्यानात घेत अप्पर तहसील कार्यालयाचा मार्ग वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून मार्गी लावला आहे. त्यास उच्चस्तरीय सचिव समितीकडून मान्यता देण्यात आली असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.