नळदुर्ग (प्रतिनिधी)-  गणेशोत्सव आणि ईद-ए- मिलाद या सण आणि उत्सवात नळदुर्ग शहरातील उपद्रवी व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई करण्याबरोबरच तडीपार सारखी कडक कारवाई करण्याचे आदेश धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी नळदुर्ग पोलिसांना दिले आहेत.

आगामी काळात साजरे होणारे गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद  या सणाच्या पार्श्वभुमीवर दि. 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी नळदुर्ग शहराला भेट देऊन तेथील परीस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी गणेश विसर्जन मिरवणुक मार्ग व ईद-ए-मिलाद जुलुसच्या मिरवणुक मार्गांवरून रूट मार्च काढला. या रूट मार्चमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्यासह पाच पोलिस अधिकारी,20 पोलिस अंमलदार 1 एसआरपीएफ प्लाटुन व 35 होमगार्ड सहभागी झाले होते.

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण आणि उत्सव सर्वांनी शांततेत साजरे करावेत. उपद्रवी लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्याबरोबरच त्यांच्यावर तडीपार सारखी कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी म्हटले आहे.

 
Top