धाराशिव (प्रतिनिधी) - पारधी समाज हा भटक्या विमुक्त जमातीत येत नसून तो आदिवासी प्रवर्गात आहे. या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत खास तरतूद करून ठेवलेल्या आहेत. मात्र आतापर्यंत याकडे फारसे कोणाचे लक्ष आणि प्रभावी अंमलबजावणी अभावी पारधी समाजातील लोकांसाठी  असलेल्या सुविधांचा लाभ बोगस नागरिक घेत आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये पारधी आदिवासींसाठी घरकुलांसह इतर विविध विकासात्मक योजना राबविल्या आहेत. मात्र राज्याच्या इतर भागात पारधी समाजाच्या विकासासाठी कुठल्याही योजना राबविल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे धाराशिवचा आदिवासी विकास पॅटर्न यापुढे अख्या महाराष्ट्रात राबविणार असल्याची ठाम ग्वाही आदिवासी पारधी महासंघाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सुनील काळे यांनी दि.22 सप्टेंबर रोजी दिली.

धाराशिव शहरातील रायगड फंक्शन हॉलमध्ये आदिवासी पारधी महासंघाच्या प्रदेश व जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आदिवासी पारधी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब साळुंखे, महासचिव रा.ना. सोनावणे, नवनियुक्त महासचिव बापू पारधी, पंडित भोसले आदींसह मान्यवर उपस्थित होते. 

तर संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब साळुंखे म्हणाले की, आम्ही आजपर्यंत संघटनेचे काम विनाकलंल केले आहे. आता नवीन पिढीला त्यांच्या विचारानुसार ही संघटना चालविण्यासाठी मी माझा सामाजिक उत्तराधिकारी म्हणून सुनील काळे यांची निवड करीत असल्याचे सांगत त्यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केल्याचे पत्र दिले. परंतू मी मरेपर्यंत या संघटनेचे काम करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. पुढे ते म्हणाले की आजपर्यंत माझ्यावर जसा विश्वास ठेवला तसाच तुम्ही सुनील काळे वर यांच्यावर विश्वास ठेवावा असे समाज बांधवास आवाहन केले. 

तसेच बापू पारधी म्हणाले की, पारधी समाज खानदेश, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या भागात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपला उदारनिर्वाह करत आहे. विखुरलेल्या पारधी बांधवावर करण्यात येणारे अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रथमतः  आदिवासी जनक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात येऊन त्या प्रतिमांचे वाटप राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व कार्यकारणी सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. प्रस्ताविक रामचंद्र पवार यांनी केले. तर सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी व उपस्थितांचे आभार दत्तू काळे यांनी मानले. यावेळी पारधी महिला व पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यमगरवाडीच्या शाळेत मुलांना दाखल करु नये

तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथे आश्रम शाळा आहे. त्या शाळेमध्ये पारधी समाजाच्या मुलांना भटके विमुक्त म्हणून दाखल केले जाते. पारधी हे आदिवासी असून ते भटके नाहीत. आजपर्यंत ज्या ज्या पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना तेथे दाखल करण्यात आले व त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांना आदिवासी समाजाचा दाखला मिळत नाही. त्या शाळेत फक्त आणि फक्त भटके विमुक्त जमातीच्या लोकांनाच प्रवेश देण्याची सोय आहे. मात्र, पारधी समाजाची दिशाभूल करून तेथील संचालक मंडळी जबरदस्तीने पारधी समाजातील मुलांना शाळेत नेण्याचा घाट घालत असल्याचा आरोप काळे यांनी केला. त्यामुळे यापुढे एकाही समाज बांधवांनी आपल्या पाल्यांना त्या शाळेत दाखल करू नये असे आवाहन त्यांनी केले.

 
Top