धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणप्रश्नी महत्वपूर्ण कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. तेलंगणा राज्य अभिलेखागार आणि संशोधन केंद्रातून उपलब्ध झालेल्या दुर्मिळ दस्तऐवजामधून अनेक महत्वाची कागदपत्रे स्कॅन करून घेतली आहेत. तज्ञांकडून त्याचा सर्वांगाने अभ्यास सुरु आहे. कोणावरही अन्याय न करता मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक निर्णयायासाठी राज्य सरकारला त्यातून मूलभूत पुरावे उपलब्ध होतील असा विश्वास आहे. मागील सहा दिवसापासून मनोज दादा जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली असून याबाबत तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे. त्यामुळे हैदराबाद गॅझेटचे महत्व विचारात घेऊन जेष्ठ विधीज्ञ, मनोज जरांगे पाटील यांनी प्राधिकृत केलेले वकील यांच्यासह संबंधितांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यावी. अशी विनंती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. तसेच पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी यांच्यासोबत देखील याबाबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
उपलब्ध झालेल्या दस्ताऐवजात हैद्राबाद गॅझेटीयरसह इतर अनेक कागदपत्रांचाही समावेश आहे. जेष्ठ विधीज्ञ तसेच मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे-पाटील यांच्याशी संबंधित कायदे सल्लागार यांच्यासह याबाबत आढावा बैठक आयोजीत केल्यास यातून योग्य कायदेशीर मार्ग निघण्यास सहकार्य होईल. त्यानुसार आढावा बैठक आयोजित करण्याची आग्रही विनंती आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.
तरुण बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये
धाराशिव तालुक्यातील कोंबडवाडी येथील परमेश्वर मिसाळ व पाटोदा येथील शिवाजी निलंगे या युवकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नाराजीतून आत्महत्या केली आहे. त्यामुळे मिसाळ आणि निलंगे परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकार वेगाने प्रयत्न करीत आहे. लवकरच आशादायक निर्णय येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे समाजातील तरुणांनी कोणत्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलून कुटुंबातील सदस्यांना दुःखाच्या खाईत लोटू नये, असे नम्र आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.