धाराशिव (प्रतिनिधी)- दुष्काळी धाराशिव जिल्ह्याला वर्षानुर्षे आस लागून राहिलेल्या कृष्णा-मराठवाडा प्रकल्पांतर्गत उजनी धरणाचे पाणी अद्याप मिळालेले नाही. याअनुषंगाने अण्णासाहेब दराडे यांनी गुरुवारी (दि.5) श्री तुळजाभवानी मंदिरात उजनी धरणातील पाणी टँकरने आणून स्वच्छता करत अनोखे आंदोलन केले.  

धाराशिव जिल्हा हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. सततचा दुष्काळ, नापिकीमुळे धाराशिव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळेच देशातील आकांक्षित जिल्हयाच्या यादीत धाराशिव जिल्हा कायम तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. मुबलक पाणी उपलब्ध झाल्यास शेतीला चांगले दिवस येतील अशा आशेवर येथील शेतकरी जगत आहे. परंतु गेल्या तीन दशकापासून कृष्णा खोऱ्यातील पाणी अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी अण्णासाहेब दराडे यांनी श्रीक्षेत्र तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरातील पायऱ्यांची उजनी धरणातील पाणी टँकरने आणून स्वच्छता केली. तसेच तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व मारुती मंदिरामध्ये उजनी धरणातील पाण्याने अभिषेकपूजा करणार असल्याचे यावेळी अण्णासाहेब दराडे यांनी सांगितले.

दरम्यान तुळजापूर येथील लोहिया मंगल कार्यालयात अण्णासाहेब दराडे यांनी शेेतकरी व नागरिकांशी संवाद साधला. धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळ मुक्तीसाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून श्री.दराडे यांनी गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांच्या प्रश्नावर तसेच शासकीय कार्यालयांमध्ये होणारी सर्वसामान्यांची पिळवणूक रोखण्यासाठी आणि नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी याकरिता आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी संभाजी भोसले, प्रा.राम घुगे, महेश पाटील, अभिमान दराडे, अंबादास घुगे, नितीन लोभे, जोतीराम मोजगे, गणेश घुगे, केशव शिवले यांच्यासह नागरिक, शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top