धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह इतर मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दि.17 सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली असून त्याचा गांभीर्याने विचार करून शासनाने त्यांच्या सर्व मागण्या तात्काळ मान्य करून त्यांचे उपोषण स्थगित करण्यात यावे. अन्यथा जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दि.18 सप्टेंबर रोजी दिला आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सगे सोयरे जीआरची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. हैद्राबाद गॅजेट लागू करण्यात यावे, सातारा गॅजेट लागू करण्यात यावे, बॉम्बे गव्हर्नमेंट गॅजेट लागू करण्यात यावी, मराठा बांधवावर झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. अन्यथा धाराशिव जिल्ह्यामध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने बेमुदत स्वरूपाचे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी. या आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असा इशारा दिला आहे. यावेळी बलराज रणदिवे, रोहीत पडवळ, अभिजीत सुर्यवंशी, अमोल जाधव, अक्षय नाईकवाडी, मुकुंद घाटगे व आकाश मुंडे आदी उपस्थित होते.