नळदुर्ग (प्रतिनिधी)- ऐन सणासुदीच्या दिवसात नळदुर्ग शहरात पाण्याचा ठणठणाट. गेल्या 14 दिवसांपासुन शहरात पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरीकांमधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरवासियांचा अंत न पाहता नगरपालिका प्रशासनाने तात्काळ शहरात पाणीपुरवठा सुरु करावा, अन्यथा नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरीकांनी दिला आहे.

नळदुर्ग शहराच्या उषाशी असणारे बोरी धरण आज पाण्याने तुडुंब भरलेले आहे असे असताना ऐन सणासुदीच्या दिवसात नगरपालिका शहरवासियांना पाणीपुरवठा करण्यात साफ अपयशी ठरली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा हा सातत्याने होत आहे. नवरात्र महोत्सव पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. सध्या शहरातील हिंदु बांधव आपली घरे स्वच्छ करण्याबरोबरच कपडे, भांडे धुणे हे काम करीत आहेत यासाठी मोठ्याप्रमाणात पाण्याची गरज असते. मात्र शहराच्या वरच्या भागात 14 दिवस झाले तरी नळाला पाणी सोडण्यात आले नाही. कधी विजेचा प्रॉब्लेम तर कधी पाणीपुरवठा यंत्रनेमध्ये बिघाड या कारणामुळे शहरात 14 दिवस झाले पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे नागरीकांची पाण्याअभावी मोठी तारांबळ उडाली आहे. नागरीकांचे पाण्यावाचुन प्रचंड हाल होत असताना शहरातील एकाही राजकीय पक्षाचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता याबाबत नगरपालिका प्रशासनाला जाब विचारण्यास तयार नाही. त्यामुळे शहरातील नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्याकडे तुळजापुर नगरपालिकेचा पदभार असल्यामुळे व सध्या नवरात्र महोत्सव अगदी तोंडावर आल्याने मुख्याधिकारी कुंभार हे तुळजापुर येथे अडकुण पडले आहेत. मात्र सध्या याठिकाणी ज्यांच्यावर पाणीपुरवठ्याची जबाबदारी आहे ते काय करत आहेत हे समजत नाही. निदान सणासुदीच्या दिवसात तरी नगरपालिकेने शहरवासियांना मुबलक व वेळेवर पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. मात्र सध्या नगरपालिकेचा कारभार रामभरोसे सुरु आहे. नळदुर्ग नगरपालिकेवर सध्या प्रशासकीय कारभार सुरु आहे. मात्र नगरपालिकेत प्रशासक म्हणुन कोण आहे हे अद्याप नळदुर्गकरांना समजलेच नाही कारण ज्यांची या नगरपालिकेवर प्रशासक म्हणुन नियुक्ती आहे ते कधीच न. प. कार्यालयाकडे फिरकले नाहीत.

शहरवासियांचा अंत न पाहता नगरपालिका प्रशासनाने तात्काळ शहरात मुबलक आणि वेळेवर पाणीपुरवठा करावा अन्यथा नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरीकांनी दिला आहे.

 
Top