धाराशिव (प्रतिनिधी) - लिंगायत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा भक्ती स्थळ (राजूर, अहमदपूर) येथून दि. 5 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. या यात्रेची सांगता दि.21 सप्टेंबर रोजी शक्ती स्थळ असलेल्या श्री शेत्र मंगळवेढा येथे दि.21 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्व समाजाचे संत महंत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे लिंगायत समाजातील जास्तीत जास्त युवक महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे, असे आवाहन खा. डॉ. अजित गोपछडे यांनी दि.10 सप्टेंबर रोजी केले.
धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे विनोद गपाट, प्रवीण पाठक, मोहन मुंडे, इंद्रजीत देवकते, हिंदू वीरशैव लिंगायत मंचचे संयोजक नितीन शेटे, शिवानंद कथले आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खा डॉ गोपछडे म्हणाले की, डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन या यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. या यात्रेचे धाराशिव जिल्ह्यात मराठा, वंजारी, कैकाडी, माळी आदीसह अठरा पगड समाजाच्यावतीने स्वागत करून देशासमोर आगळे वेगळे उदाहरण निर्माण केले आहे. ही यात्रा लातूर, धाराशिव, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आदींसह 17 काढण्यात येणार आहे. यामध्ये महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, लिंगायत समाजातील मुला-मुलींसाठी वसतिगृह उभारणे, विखुरलेल्या समाजाला एकत्र आणणे आदी बाबत समाज प्रबोधन करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच लिंगायत समाजाचे 1982 साली 22 आमदार होते. मात्र आज या समाजाची दीड कोटी लोकसंख्या असताना देखील केवळ मी बाहेरच्या दाराने खासदार झालो असल्याचे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली. लिंगायत समाजाच्या 57 पोट जाती असून त्यापैकी फक्त लिंगायत वाणी या जातीला आरक्षण मिळत आहे. त्यामुळे उर्वरित लिंगायत समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तसेच लिंगायत हे हिंदू असून हिंदू हेच राष्ट्रीयत्व व राष्ट्रभक्ती असल्याचे सांगत ते म्हणाले की, समाजामध्ये राष्ट्रभक्तीचे धडे देण्यासह एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. युवकांना दिशा देणे बरकटलेल्यांना चांगला संस्कार देण्यासाठी ही यात्रा असून युवकांनी सोशल माध्यमावर लिंगायत समाज पेज काढून समाजाला एकत्र करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे समाजा समाजामध्ये फूड पाडण्याचे षडयंत्र सुरू असून ते थांबविणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महात्मा बसवेश्वरांची शिकवण व संस्कार शिकण्यासाठी दि. 21 सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र मंगळवेढा येथे होणाऱ्या वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा समारंभ कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन त्यांनी केले.