धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाय योजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने व उपकरणे खरेदी करिता एक वेळ एकरकमी 3,000 रुपये रक्कम देण्यात येणार असून या योजनेची अंमलबजावणी अत्यंतिक अग्रक्रमाने करण्याच्या सुचना आमदार राणाजगजिसिंह पाटील यांनी या योजनेचे जिल्हास्तरीय अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी व सदस्य सचिव असलेल्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांना दिल्या आहेत व ज्येष्ठांनी याचा आवर्जून लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
वय वर्षे 65 आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवन सामान्य स्थितीत जगता यावे, त्यांच्या आरोग्यासंबंधित गोष्टींची व सुविधांची पूर्तता करता यावी याकरिता रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
वयोमानानुसार येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य्य साधने / उपकरणे खरेदी करण्यासाठी पात्र व्यक्तींच्या बँक खात्यात एकरकमी 3,000 रुपये रक्कम जमा करण्यात येणार आहेत. या रकमेतून लाभार्थ्यांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टीक, व्हील चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खूर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाईकल कॉलर यासारखी उपकरणे खरेदी करता येणार आहेत. तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देऊन त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवले जाणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात आजवर जवळपास 10000 अर्ज प्राप्त झाले असून 1502 अर्जाची छाणनी पूर्ण करून पात्र करण्यात आले आहेत. यापूर्वी योजनेचे अर्ज समाजकल्याण विभागाचे कार्यालय व त्या अंतर्गत येणारे वसतिगृह व शाळा येथे स्वीकारण्याबाबत समाजकल्याण विभागाने कळविले होते. मात्र जेष्ठांची होणारी गैरसोय विचारात घेवून जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना सदर अर्ज गावातच ग्रामपंचायत मध्ये जमा करून पुढे समाजकल्याण विभागाकडे देण्याबाबत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सूचित केले होते. त्यानुसार आता गावातच ग्रामपंचायतीमध्ये अर्ज जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासकीय यंत्रणेला तर प्राधान्याने योजनेच्या अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, मात्र वृध्दांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी युवकांनी देखील पुढे येवून सहकार्य करण्याचे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
वृध्दांसाठी आधार ठरलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल व यासाठी तत्परतेने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.