धाराशिव (प्रतिनिधी)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यात विविध महाविद्यालयातून प्रत्येकी एक आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येणार असून त्यापैकी एक केंद्र धाराशिव जिल्ह्यातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय या ठिकाणी स्थापन होणार आहे. या केंद्राचे उद्घाटन प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणाली द्वारे (ऑनलाईन) महाविद्यालयाच्या विवेकानंद सभागृहामध्ये होणार आहे.
या कौशल्य विकास केंद्रामार्फत विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराभिमुख कौशल्य विकसित करण्यासाठी महाविद्यालयामध्ये ऑफिस एक्झिक्यूटिव्ह आणि जीएसटी असिस्टंट हे दोन कोर्सेस राबवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी हे दोन्ही कोर्सेस अत्यंत महत्त्वाचे आहेत तसेच हे दोन्ही कोर्स विद्यार्थ्यांसाठी निशुल्क असतील. या उद्घाटन समारंभास दूरदृष्टी प्रणाली द्वारे राज्याचे राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.याचबरोबर प्रत्यक्ष महाविद्यालयात स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षण तज्ञ, पालक, विद्यार्थी- विद्यार्थिनी इत्यादी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस.एस. फुलसागर व आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. मंगेश भोसले यांनी दिली आहे.