धाराशिव (प्रतिनिधी)- सध्याच्या असुरक्षित आणि धकाधकीच्या स्पर्धात्मक युगात सर्वचजण मात्र फिटनेस विसरले आहेत. स्वसंरक्षणासह फिटनेससाठी ज्युदो या ऑलिंपिक क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण सर्वांसाठी आवश्यक असल्याचे मत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांनी व्यक्त केले. 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि धाराशिव जिल्हा ज्युदो संघटनेच्या वतीने धाराशिवेतील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त मूख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ज्युदो संघटनेचे अध्यक्ष नितीन काळे, क्रीडा भारतीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष मिलिंद डांगे, देवगिरी प्रांत सहसचिव राजेंद्र कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव, जिल्हा संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, सहसचिव अभय वाघोलीकर, क्रीडा अधिकारी अक्षय बिराजदार, डिंपल ठाकरे, स्पर्धा विभाग प्रमुख प्रतापसिंह राठोड, तांत्रिक समिती सचिव कैलास लांडगे, रवी गोडसे, अजिंक्य  वराळे, सचिन कोकीळ आदींसह जिल्हा संघटनेचे पदाधिकारी जुदोपटू मार्गदर्शक व पालकांचे प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धा 14, 17 व 19 वर्षे वयोगटातील मुला मुलींच्या विविध वजनी गटात घेण्यात आल्या असून स्पर्धेत जिल्हाभरातून 218 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेतील विविध वजनी गटातील विजेते खेळाडू लातूर विभागीय शालेय जुदो स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. स्पर्धेत प्रतापसिंह राठोड, कैलास लांडगे, साई राठोड, ओंकार चौरे, आदित्य काळे आणि प्रसाद  निंबाळकर आदींनी पंच म्हणून काम पाहिले.


 
Top