उमरगा (प्रतिनिधी)- 5 सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण देशात व महाराष्ट्रातही मोठ्या उत्साहात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र काम करून देशाचा उत्तम नागरिक व देशाची भावी पिढी घडविण्याचे कार्य शिक्षक करत असतात. ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता, शांताई मंगल कार्यालय, उमरगा येथे तालुक्यातील उपक्रमशील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली.
या कार्यक्रमास जळगाव येथील मनोबल दीपस्तंभ फाऊंडेशनचे यजुवेंद्र महाजन यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.खा.प्रा.रविंद्र गायकवाड, उद्घाटक कृ.उ.बाजार समितीचे मा.सभापती जितेंद्र शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणुन युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, मा.सभापती मोहयोद्दिन सुलतान, शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, उमरगा गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, लोहारा गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण उपस्थित राहणार आहेत. संस्थेच्या निवड समितीमार्फत 75 शिक्षकांची निवड प्रक्रिया संपन्न झाली असून उमरगा लोहारा तालुक्यातील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सचिव प्रदीप मदने, उपाध्यक्ष विजय वडदरे, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, लोहारा तालुकाप्रमुख जगन पाटील यांनी केले आहे.