धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक पर्यटन दिनानिमित्त 27 सप्टेंबर रोजी पर्यटन जनजागृती संस्थेच्या वतीने धाराशिव तालुक्यातील तेर येथे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. तेर येथील त्रिविक्रम मंदिरापासून हेरिटेज वॉकची सुरुवात होणार असून, यानिमित्ताने तेर येथील ऐतिहासिक वारसा पर्यटकांना माहिती व्हावा, पर्यटकांपर्यंत पोहोचावा आणि जिल्ह्याचे पर्यटन वाढावे या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील पर्यटन प्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यटन जनजागृती संस्था मागील अनेक वर्षांपासून धाराशिव जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास होऊन जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय वाढावा या हेतूने अनेक कार्यक्रम - उपक्रम आयोजित करत आहे. याचाच एक भाग म्हणून 27 सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनानिमित्त तेर येथे असलेला ऐतिहासिक दुर्मिळ ठेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या हेरिटेज वॉक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात त्रिविक्रम मंदिरातून होणार असून तीर्थकुंड आणि चैत्यगृह या दोन्ही ठिकाणापर्यंत हा हेरिटेज वॉक असणार आहे.

त्रिविक्रम मंदिराला असलेला ऐतिहासिक संदर्भ आणि पर्यटन विभागाने या ठिकाणी सुरू केलेले दुरुस्तीचे काम या ठिकाणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवून पर्यटकांना तेर सारख्या ऐतिहासिक पर्यटन स्थळाकडे आकर्षित करण्यासाठी या हेरिटेज वॉकचा उपयोग होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या हेरिटेज वॉक साठी तेर येथे 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे. असे आवाहन पर्यटन जनजागृती संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top