धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हयाचे मागासलेपण ओळखून केंद्र सरकारने जिल्हयाचा समावेश आकांक्षित जिल्हयात केला आहे.जिल्हयाचे मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचा मंत्री म्हणून 24 महिन्यात 42 निर्णय घेवून महाराष्ट्र निरोगी करण्याचा संकल्प केला असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिली.

17 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत बोलत होते.

यावेळी स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगावकर,बुबासाहेब जाधव,प्रकाशराव तोडकरी,गोविंद नलवडे,शेषराव बनसोडे व बाळासाहेब टापरे,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार सर्वश्री कैलास पाटील,राणाजगजितसिंह पाटील,ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधिक्षक संजय जाधव,अपर पोलीस अधिक्षक गौहर हसन व निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव व विविध राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्रा.डॉ.सावंत म्हणाले,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा या योजनेत राज्यात अव्वलस्थानी आहे.16 सप्टेंबरपर्यत 3 लक्ष 92 हजार 924 महिला योजनेच्या लाभासाठी पात्र ठरल्या आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्हयात आतापर्यंत 3 हजार 569 प्रशिक्षार्थी शासकीय आस्थापनेत आणि 358 खाजगी आस्थापनेत असे एकूण 3927 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी रूजू झाले आहेत. असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या स्मृती स्तंभास अभिवादन केले. पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत झाले. यावेळी स्मृतीस्तंभास पोलीस पथकाने बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या केंद्र सरकारच्या “ स्वच्छताही सेवा “ या अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केला. पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या “आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी ” या आरोग्यविषयक उपक्रमाची दखल इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी सलग तिसऱ्यांदा नोंद घेतल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी पालकमंत्री प्रा. डॉ. सावंत यांचे पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ देवून सत्कार करून अभिनंदन केले. पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या हस्ते जिल्हास्तरीय युवा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पालकमंत्र्यानी कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांचे ज्येष्ठ नागरिक, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी-कर्मचारी,विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार बांधव व नागरिकांची भेट घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार शिक्षक हनमंत पडवळ यांनी मानले.

 
Top