धाराशिव  (प्रतिनिधी) - नागरिकांच्या दैनंदिन आहार व जीवनामध्ये सूर्यफुलाचे अनन्यसाधारण महत्त्व होते. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये खरीप हंगामात सूर्यफूल पेरले जात होते. त्यामुळे संपूर्ण शिवार सूर्यफुलांच्या पिवळ्या रंगाची झालर हिरव्या शालूवर हळदीच्या पदराची सोनरी जरी अतिशय मोहकपणे खुलून दिसायची. मात्र या सूर्यफुलाची जागा सोयाबीन या पिकाने व्यापून टाकल्याने ते सुर्यफुल पीक जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातून जवळजवळ हद्दपार झाल्यात जमा आहे. मात्र लोहारा तालुक्यातील मार्डी येथील हिराचंद बाजीराव देवकर या शेतकऱ्याने आपल्या शेतात सूर्यफूल पीक पेरून इतर शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे सूर्यफुलाचे खाद्यतेल शरीरास अत्यंत उपयुक्त आहे. काहीजण रक्त शुद्धीसाठी सूर्यफूल आवर्जून खातात हे विशेष म्हणावे लागेल.

भारत हा शेती प्रधान देश म्हणून ओळखला जातो. करण 85 टक्के नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीशी निगडित व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकरी पूर्वी सूर्यफूल, तूर, उडीद, मूग, बाजरी, मका, हायब्रीड, बारके कारळे, भात (साळ), वरई, राळा, नरिंगा, हुलगा, मटकी, मुगी आदींसह विविध पिके घेत होते. मात्र काळा मानाने पीक पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल होत गेले असून यामधील सूर्यफूल, बाजरी, हायब्रीड, बारके कारळे, वरई, राळा, नरिंगा, मुगी, हुलगा व मटकी आधी पिकाकडे शेतकऱ्यांनी चक्क पाठ फिरवली आहे. या पिकांची जागा सोयाबीन पिकाने घेतली असून सर्व शिवार सोयाबीनने व्यापून गेले आहेत.


 
Top