धाराशिव (प्रतिनिधी) - धाराशिव नगर परिषदेमार्फत शहरातील उचलण्यात येणार्या कचर्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात येत नसल्यामुळे दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिकांना श्वसनासह विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्यामुळे कचरा डेपोमधील कचर्यावर योग्य प्रक्रिया करण्यात यावी किंवा डेपो तात्काळ दुसर्या ठिकाणी हलविण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवा सेना (ठाकरे) तसेच स्थानिक नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.
जिल्हाधिकार्यांना गुरुवारी (दि.26) मागण्याचे निवेदन युवा सेनेच्या वतीने देण्यात आले. निवेदनात म्हटले की, धाराशिव शहरातील कचरा नगर परिषदेमार्फत उचलण्यात येणारा कचरा हा शहरालगतच्या कचरा डेपो येथे टाकण्यात येतो. मात्र हा कचरा नेमका डेपो असलेल्या जागेवर टाकण्याऐवजी रस्त्यालगतच टाकण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. या कचर्यामध्ये जनावरांचे टाकाऊ मांसही असते. त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन साथरोग पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
दुर्गंधीमुळे अनेकांना श्वसनाचे आजार झाले आहेत. डेंग्यूसदृश आजाराची लागण बालकांना होत आहे. या परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या कचर्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. कचर्यावर योग्य प्रक्रिया व कचर्याचे विलगीकरण केल्यास नागरिकांची दुर्गंधीपासून मुक्तता होऊ शकते. कचर्यावर प्रक्रिया करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे शक्य नसेल तर हा कचरा डेपो इतरत्र हलवून परिसरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवावे. यासाठी संबंधित यंत्रणेला योग्य ते आदेश द्यावेत ही विनंती. येत्या 15 दिवसांत योग्य ती कार्यवाही न झाल्यास युवासेना व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा प्रशासन व नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर युवासेना शहरप्रमुख रवि वाघमारे, शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव, शिवसेनेचे मा.नगरसेवक गणेश खोचरे, कृष्णा वाघमारे, नरेश लेणेकर, प्रदीप तेरकर, संजय माने, मनोज जाधव, सौरभ काकडे, युवराज मडके, मनोज जमादार, अर्जुन पवार, सुनील परसे, प्रवीण तट, ओंकार भोरे, शरद पाटील, राजू चव्हाण, योगेश साळुंके, अविनाश इरकर, पी.डी.पाटील, दिलीप डोंबे, सचिन गुंडाळे, सचिन बेद्रे, राज निकम, सुरज लोंढे, प्रदीप साळुंके, दिलीप महाजन, अमोल जाधव, गजेंद्र शेरकर, सुहास शेरकर यांच्यासह गणेशनगर, इंगळे गल्ली, खाजा नगर भागातील नागरिकांची स्वाक्षरी आहे.