नळदुर्ग (प्रतिनिधी)- पतीने केलेले अतिक्रमण सिंदगाव ता. तुळजापुर येथील महिला ग्रामपंचायत सदस्याला चांगलेच महागात पडले असुन धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी याप्रकारणी सिंदगाव ग्रामपंचायतीच्या ग्राम पंचायत सदस्या जयमाला शिवानंद करंडे यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. त्यामुळे नंदगाव पाठोपाठ सिंदगाव येथील महिला ग्राम पंचायत सदस्यांलाही पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

सिंदगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य चांदपाशा नदाफ यांनी सिंदगावच्या ग्रामपंचायत सदस्या व विद्यमान उपसरपंच जयमाला शिवानंद करंडे यांचे पती शिवानंद आप्पाशा करंडे यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेऊन याप्रकारणी तुजाळपुर तहसिदारांना चौकशी करण्याचे आदेश देऊन अहवाल सादर करण्यास सांगितले होते. यानंतर तहसिलदार यांनी चौकशी करून शिवानंद आप्पाशा करंडे यांनी अतिक्रमण केले असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला. या अहवालानुसार जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम1958 चे कलम 14 अन्वये सिंदगावच्या ग्रामपंचायत सदस्या जयमाला शिवानंद करंडे यांना ग्राम पंचायत सदस्य म्हणुन अपात्र केले आहे. त्यामुळे जयमाला करंडे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द झाले आहे.

पतीने केलेल्या अतिक्रमणामुळे एका महिला ग्रामपंचायत सदस्याला पदावरून अपात्र व्हावे लागले आहे.हे प्रकरण चांदपाशा नदाफ यांनी लावुन धरल्याने हा निकाल आला आहे. धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे पदाचा गैरवापर करून सरकारी जागेवर अतिक्रमण केलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

 
Top