परंडा (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत विधानपरिषदेतील भाषणाबद्दल “उत्कृष्ट भाषण” या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मंगळवार दि.3 सप्टेंबर 2024 रोजी दु. 3.30 वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे संपन्न होणार आहे. माजी आमदार ठाकूर यांना विधानमंडळ कार्यालयातून दूरध्वनी व ईमेल करून या पुरस्काराबद्दल कळविण्यात आले आहे.

या समारंभास महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल  सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गो-हे व विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ हे उपस्थित राहणार आहेत.

माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना सन 2018-19 करिता महाराष्ट्र विधानपरिषद “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार देण्यात येत असून ठाकूर यांनी विधीमंडळात मराठवाडा आणि धाराशिव जिल्ह्यात सततचा पडणारा दुष्काळ, पाणी टंचाई, मराठवाड्याचे हक्काचे 23.66 टीएमसी कृष्णा खो-यातील पाणी, शेतकरी कर्ज माफी, जलयुक्त शिवार, शेतीपंपाचा वीज प्रश्न, मराठवाड्याचे मागासलेपण, दरडोई कमी असलेले उत्पन्न, धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालय आदी राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचे अनेक विषय प्रभावीपणे सभागृहात मांडले होते. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना “उत्कृष्ट भाषण” हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ठाकूर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 
Top