धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांना विविध त्रुटी काढून पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व दिलेले उद्दिष्ट पूर्ण न केलेल्या 8 बँकांवर जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये धाराशिव शहरातील 7 तर कळंब येथील बँक ऑफ महाराष्ट्रचा समावेश आहे. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कर्जवाटप न करणाऱ्या बँकांवर कारवाईचे आदेश दिले होते.
कर्जवाटप न करणाऱ्या बँकांवर कारवाई होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. सहायक निबंधक आशाबाई कांबळे यांच्या फिर्यादीनुसार 7 बँकावर आनंदनगर पोलिस ठाण्यात तर महाराष्ट्र बँकेवर कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी 1 जुलै रोजीच्या बैठकीत 15 दिवसात कर्ज वितरण करण्याचे आदेश दिले होते. 18 जुलै रोजी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत दिलेल्या उद्दिष्टानुसार कर्ज वाटप केले नसल्याचे निदर्शनास आले. 35 बँकांनी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा 30 टक्केहून कमी कर्ज वाटप केल्याचा अहवाल सहायक निबंधकांनी सादर केला होता. त्यानुसार बंधन बँकेचे सागर चौगुले, डीसीबी बँकेचे रणजित शिंदे, आयडीएफसी बँकेचे संजय शिनगारे, इन्डसलन्ड बँकेचे दुर्गाप्रसाद जोशी, कोटक महिंद्रा बँकेचे तारीक अहमद, इंडियन बँकेचे अय्यपा पासवान, युको बँकेचे शाम शर्मा या सात बँकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कर्ज घेण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना विविध कारणावरून तसेच कागदपत्रातील त्रुटी दाखवत कर्ज मिळविण्यास ते कसे अपात्र आहेत ते सांगितले जात होते. बँकांच्या विविध शाखांमध्ये हेलपाटे मारून विविध तालुक्यातील शेतकरी वैतागले असल्याने ही कारवाई झाली.