धाराशिव (प्रतिनिधी)-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी 14 सप्टेंबर रोजी परंडा शहरात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी 10 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय, परंडा येथील सभागृहात घेतला.यावेळी जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनी कार्यक्रम स्थळ, हेलिपॅड आणि पार्किंग व्यवस्थेची पाहणी केली. बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी विभाग प्रमुखांना कार्यक्रमाच्या विविध जबाबदाऱ्या सोपविल्या. परंडा येथे महिला भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक गौहर हसन, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्राजंल शिंदे,कार्यकारी अभियंता एन.व्ही.भंडे,उपविभागीय पोलिस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ,पालकमंत्री यांचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. 

राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू केलेली आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतून आर्थिक लाभ पात्र महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा करणे सुरू आहे.महिला सक्षमीकरणासह त्यांच्या सुरक्षेसाठीही प्राधान्य देण्यात येत आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील महिला लाभार्थी,मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील लाभार्थी,तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात उत्कृष्ट कार्य केलेल्या अंगणवाडी सेविकांचा प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मान्यवरांच्या  हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील महिलांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.


 
Top