धाराशिव (प्रतिनिधी) - 100 टक्के अनुदानित असलेल्या मागास माध्यमिक विद्यालय आश्रम शाळेतील मुख्याध्यापकांसह इतर 26 कर्मचाऱ्यांचे वेतन देऊन त्यांची उपासमार थांबवावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आमरण उपोषणाचा आजचा दि.4 सप्टेंबर रोजी सोळावा दिवस आहे. मात्र, संबंधित विभागाचे अधिकारी किंवा एकही कर्मचारी या उपोषणकर्त्यांकडे फिरकीला नाही. त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव आत्महत्या सारखा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 100 मान्यता दिली असून ती काढून घेण्यात आली अशी खोटी माहिती मंत्रालयात देऊन शासनाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे आम्हाला न्याय द्यावा, या मागणीसाठी मुख्याध्यापकांसह कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
लोहारा येथील युवक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मागास माध्यमिक सरस्वती कन्या विद्यालय संलग्न सावित्रीबाई फुले मागासवर्गीय तालुका कन्या वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे. या आश्रम शाळेवर कार्यरत असलेल्या 27 कर्मचाऱ्यांपैकी एका कर्मचाऱ्यास 1 कोटी 50 लाख रुपये वेतन देण्याचा आदेश दिला आहे. दि. 25 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री यांच्या सचिवांनी पत्रकान्वये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांनी शाळा पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे सांगितले. परंतू आश्वासन देऊन एक महिन्याचा कालावधी लोटला तरी अद्यापपर्यंत त्या शाळेची पाहणी करण्यासाठी एक अधिकारी किंवा कर्मचारी देखील फिरकलेले नाहीत. विशेष म्हणजे या आश्रम शाळेला 100 टक्के अनुदानित मान्यता आहे. मात्र आजतागायत त्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आलेले नाही. आमरण उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांना बी.पी., शुगर व इतर व्याधींचा त्रास आहे. उपोषणासाठी बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मुख्याध्यापक बाबासाहेब साळवे, सेवक नामदेव कदम, सेविका गिता सौदागर, संगीता राठोड व स्वयंपाकी छाया कवाळे यांचा समावेश आहे.