धाराशिव  (प्रतिनिधी)-  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्हा चांगल्याप्रकारे काम करत आहे.जिल्हयातील युवक-युवतींना या योजनेअंतर्गत रोजगार आणि प्रशिक्षण देण्यात जिल्हा मराठवाडा विभागात अग्रेसर आहे.याचा पुढचा टप्पा देखील लवकर गाठण्यासाठी सर्व विभागांनी आपल्या कार्यालयात रिक्त असणारी पदे ही ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारुन या योजनेअंतर्गत तातडीने भरावी. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी जिल्हयातील सर्व विभाग प्रमुखांना दिले.

कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने  सुरु करण्यात आलेल्या “ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आढावा दि. 22 ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी डॉ.ओंबासे बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त संजय गुरव व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ.ओंबासे यावेळी म्हणाले की, जिल्हयातील बहुतांश विभागांनी या योजनेसाठी चांगले काम केले आहे. जिल्हय़ातील युवक-युवतींना रोजगारासह शासकीय आणि खाजगी आस्थापनातही या योजनेतून प्रशिक्षण मिळत आहे.रोजगारभिमुख हे प्रशिक्षण असल्याने त्यांच्या कौशल्याचा विकास होत आहे. जिल्हय़ात 3 हजारांपेक्षा जास्त युवक-युवतींना या योजनेच्या प्रशिक्षणासाठी आदेश देवून विविध विभागात रुजू करुन घेतले आहे. यापुढील टप्पा गाठण्यासाठी सर्व विभागांनी त्यांच्या विभागातंर्गत रिक्त पदे तात्काळ ऑफलाईन पध्दतीने अर्ज जमा करुन भरुन घ्यावीत, असे डॉ. ओंबासे यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी विभागनिहाय या योजनेचा आढावा घेतला.कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त गुरव यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांनी ऑनलाईन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ऑनलाईन केलेली रिक्त पदे ही ऑफलाईन करण्याची पध्दतही यावेळी त्यांनी सांगितली.

आढावा बैठकीला जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी सभागृहात उपस्थित होते. तर तालुकास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाअंतर्गत या योजनेअंतर्गत भरलेली आणि रिक्त पदांची माहिती दिली.

 
Top