उमरगा (प्रतिनिधी)- बदलापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बुधवारी दि. 21 ऑगस्ट रोजी राज्यपाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
तहसीलदार गोविंद येरमे यांच्या मार्फत राज्यपालांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बदलापूर येथील एका नामांकित शाळेत रविवारी दि. 4 ऑगस्ट 2024 रोजी चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला. हि घटना घडून पाच सहा दिवस झाले. तरी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला नाही. सरकार गुन्हेगारांना व संस्था चालकाला पाठीशी घालण्याचा प्रकार करत होते. म्हणून पालकांना त्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. याची जबाबदारी शिक्षण मंत्री दिपक केसरकर व गृहमंत्री देवेंद्र फडवणीस या दोघांची असून मुख्यमंत्र्यांनी दोघांचाही राजीनामा घेऊन मंत्री मंडळातून बाहेर काढावे. हि केस जलदगती न्यायालयात चालवून गुन्हेगारास फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. निवेदनावर तालुका अध्यक्ष संजय पवार, ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष अविनाश रेनके, महिला आघाडी तालुका अध्यक्ष संगीता सलगर, युवक तालुका अध्यक्ष प्रदिप जाधव, तालुका उपाअध्यक्ष विजयकुमार थिटे, दिपक राठोड, लक्ष्मी गंगावणे, राऊ भोसले, अलका गुरव, बेबी स्वामी, वनिता गायकवाड आदीसह महिला व पुरुष पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.