धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील सोनारी येथील एका शेतकऱ्याचे फळबागाचे कुशल बील ऑनलाईन करण्यासाठी कंत्राटी डाटा ऑपरेटर विकास बनसोडे यास 2 हजार रूपये लाच स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचे भावाचे नाव महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत सोनारी येथे शेत गट नंबर 92 मध्ये लागवड केली होती. सदरील केळी फळबागेचे 39 हजार 852 रूपयाचे कुशल बिल ऑनलाईन अपलोड करण्यासाठी तसेच तक्रारदार शेतकरी यांचे पुढील महिन्यात निघणारे दोन मस्टरचे बील ऑनलाईन अपलोड करण्यासाठी येथील कृषी कार्यालयात कंत्राटी डाटा ऑपरेटर विकास बनसोडे यांने त्यांच्याकडे 2500 रूपये मागणी केली होती. तडजोडअंती 2 हजार रूपये देण्याचे मान्य करून 2 हजार रूपये रक्कम पंचासमक्ष स्विकारताना पकडण्यात आले. या प्रकरणी परंडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, उपअधिक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास राठोड तसेच सापळा पथकातील पोलिस अंमलदार इप्तिकार शेख, मधुकर जाधव, विशाल डोके, चालक दत्तात्रेय करडे आदींनी केली.