धाराशिव  (प्रतिनिधी)- महिला आणि मुलींना स्वावलंबी,आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे.या योजनेतील लाभार्थ्यांना 14 ऑगस्टपासून सुरुवातीचे दोन हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 

आपल्या खात्यावर पैसे आल्याचे पाहून जिल्हयातील महिला समाधानी व आनंदी झाल्या आहेत.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासह सक्षम आर्थिक बळ देण्याचे काम करणार असल्याच्या प्रतिक्रिया महिलांमध्ये उमटताना दिसत आहेत. रक्षाबंधनाची ओळवणीच भाऊरायाने बहीणीस दिल्याने अनेक बहिणींनी हृदयात साठवून ठेवलेल्या समाधानाच्या हुंदक्यास त्यांनी वाट मोकळी करुन देत आपल्या शब्दात राज्य सरकारचे मनापासून आभार मानले आहेत. 


अन पैसे खात्यात जमा होताच विश्वास दृढ झाला



मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाल्याची माहिती झाली. योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे जमा करुन प्रशासनाकडे अर्ज दाखल केला.काही दिवसानंतर अर्ज पात्र ठरल्याचा संदेश आला.मात्र,अर्ज पात्र ठरुनही योजनेबाबत अनेक गैरसमज समाजात चर्चिले जात होते.देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले,मात्र खऱ्या अर्थाने स्त्रीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 14 ऑगस्ट रोजी लाभाचे 3 हजार रुपये आधारसंलग्न केलेल्या खात्यावर जमा झाल्याने आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे.यामुळे योजनेबाबतचा विश्वास आणखीनच दृढ झाला.तसेच ती सकाळ माझ्यासाठी आर्थिक सक्षमतेकडे जाणारी ठरली आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे आता मला आर्थिक गरजेसाठी कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.

सौ.संघमित्रा दत्तात्रय अंकुशराव 

मु.पो.बामणी ता.जि.धाराशिव


संसारातील आर्थिक गरजा पूर्ण करता येतील



मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही संसारासाठी संजीवनी ठरली आहे.माझे पती सोलापूरच्या आडतीमध्ये मजूरी करतात.त्यांच्या एकटयावर माझ्या कुटूंबाचा खर्च सुरु होता.त्यातच माझ्या पतीस कधी काम मिळते तर कधी मिळत नाही.यामुळे दैनंदिन खर्च करताना आर्थिक अडचणी निर्माण होत होत्या.त्यातच दोन मुलांचा 

शैक्षणिक खर्च भागविणेही कठीण होते.परंतू 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दोन महिन्याचा लाभ माझ्या खात्यावर जमा झाल्याने घर खर्च भागविण्यास मदत झाली आहे. 

कोमल किरण गायकवाड, 

आरळी बु.ता.तुळजापूर जि.धाराशिव,


खांद्यावरचा भार कमी झाल्याचे समाधान



महिलांना आजपर्यंत आर्थिक निर्णय घेताना डावलले गेले आहे.मात्र,राज्य सरकारने हीच बाब ओळखून थेट महिलांना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली असावी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दोन महिन्याचा लाभ माझ्या खात्यात जमा झाला आहे.योजनेच्या या लाभामुळे माझ्या कुंटूंबास मोठा आधार मिळाला आहे.माझे पती मानसिकदृष्टया आजारी आहेत.यामुळे संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी माझ्या खांद्यावर होती.कुटूंबाचा भार सांभाळताना प्रचंड आर्थिक ओढाताण होत असे.मात्र,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याने खांद्यावरचा भार कमी झाला आहे.याचे मला समाधान असून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह सरकारचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.तसेच या योजनेसाठी सरकारचे मनापासून आभार.

अलका प्रकाश मगर, 

शिंगोली, ता.जि.धाराशिव


शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी मदत



मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दोन महिन्याचा लाभ माझ्या खात्यात जमा झाला आहे.योजनेच्या या लाभामुळे मला मोठा आधार मिळाला आहे.माझ्या शिक्षणासाठी आणि माझा स्वाभिमान जपण्यासाठी हा लाभ उपयोगी पडणार आहे.  मुख्यमंत्री यांच्यासह सरकारचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे.तसेच या योजनेसाठी सरकारचे आभार.

दिशा भारत माने, बेंबळी,ता.जि.धाराशिव

 
Top