धाराशिव (प्रतिनिधी)- यावर्षीचा खरीप हंगाम संपत आला तरीही एकूण 4 लाख 9 हजार 995 खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ 99 हजार शेतकऱ्यांनाच बँकांनी पीककर्जाचे वाटप केले. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा हे केवळ 56 टक्केच कर्ज आहे. दरम्यान, सीबिल खराब असल्याचे सांगून पीककर्ज देणे टाळले जात असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. याची दखल प्रशासनाने दुसऱ्या दिवशीही घेतली नाही. मात्र आमदार कैलास पाटील यांनी उपोषणकर्त्यांना भेट देवून पाठिंबा दर्शवला. यावेळी आमदार पाटील यांनी सरकारच्या आदेशाला केराची टोपली देवून सीबिल पाहूनच बँक पीककर्ज देत आहे. त्याबद्दल सरकारच नुसत्याच फसव्या घोषणाचा पाऊस करीत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
खरीप हंगाम संपत आला तरी शेतकऱ्यांना कर्ज वाटपात बँका हात आखडता घेत आहेत. जिल्ह्यात 4 लाख 9 हजार 995 शेतकरी आहेत. यापैकी सुमारे 99 हजार जणांना कर्जाचे वाटप केले. 1583 कोटींचे उद्दिष्ट असतानाही बँकांनी केवळ 950 कोटींचे कर्ज वितरीत केले आहे. बँकांच्या या भूमिकेमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. उमरेगव्हाण, ता. धाराशिव येथील नागनाथ बोरगावकर, विठ्ठल चव्हाण, उमेश सपकाळ, सुशीलकुमार पाडोळे, त्रिंबक पाटील यांनी दोन दिवसांपासून बँकेकडून कर्ज नाकारले जात असल्याचे पाहून आमरण उपोषण सुरू केले. या शेतकऱ्यांना केवळ सीबिल पाहून कर्ज वितरण होत नाही. त्यांच्या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नाही. आमदार कैलास पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे (उबाठा) शहरप्रमुख सोमनाथ गुरव, शिवसैनिक उपस्थित होते.