धाराशिव (प्रतिनिधी)- उमरगा व लोहारा तालुक्यामध्ये शासकीय योजना पोहोचविण्यात आजपर्यंतचे आमदार असमर्थ ठरले आहेत. ते फक्त इतक्या कोटी रुपयांचा निधी आणला अशी पत्र दाखवीत आहेत. मात्र त्या निधीतून कोणाचा व कोणत्या भागाचा विकास झाला? हे अद्याप जनतेला दिसलेले नाही. शासकीय नोकरीत असल्यापासूनच मी सर्वसामान्य जनतेशी जोडलेला असून त्यांचे अनेक प्रश्न सोडविले आहेत. ते सोडविण्यासाठी काय करावे लागते ? याची मला पूर्णपणे जाणीव आहे. त्यामुळे तळागाळातील जनतेच्या सेवेसाठी मी उमरगा - लोहारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा सातलिंग स्वामी यांनी केली.
धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात 14 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे उमरगा तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार, भीमाशंकर यादगौडा, विजय स्वामी व संजय रेणुके आदी उपस्थित होते. पुढे बोलताना स्वामी म्हणाले की, उमरगा व लोहारा तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, कामगार व दिव्यांग यांना शासकीय योजनेचा आजपर्यंत लाभ मिळालेला नाही किंवा त्यासाठी संबंधितांनी प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील हजारो नागरिक विकासापासून वंचित राहिलेले आहेत. मी सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून काम करीत असून वीरशैव संघटनेचा कार्यकर्ता ते राज्य कार्यकारणीपर्यंत काम केलेले आहे. या संघटनेचा मी राज्य सरचिटणीस असून शासन दरबारी राबविण्यात येणाऱ्या योजना जनतेच्या पदरात पाडून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. जनतेच्या विविध कामासाठी आजपर्यंत मदत केली असल्यामुळे सर्व समाजाच्या नागरिकांशी माझा थेट संपर्क असून त्या योजना त्यांना कशा मिळवून द्यायच्या ? याची मला पूर्णपणे जाणीव असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोहारा तालुक्याची निर्मिती होऊन बरीच वर्षे झाली असली तरी त्या ठिकाणी अनेक शासकीय कार्यालये व बस स्थानक नाही. तर उमरगा येथील एमआयडीसीत उद्योग नसल्यामुळे मी निवडून आल्यास या भागाचा विकास करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करून ते काम पूर्णत्वास नेणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच दोन्ही तालुक्यात विविध विकासाच्या योजना आणण्याबरोबरच एमआयडीसीमध्ये उद्योग उभा करून तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी निश्चितपणे शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.