धाराशिव (प्रतिनिधी) - मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच धाराशिव जिल्ह्यातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे व स्मारकांचे रचनात्मक गुणांकन (स्ट्रक्चरल ऑडिट) करुन देखभाल व दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याकडे दि.31 ऑगस्ट रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दि.4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनी राजकोट किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उभारण्यात आला होता. परंतू दि.28 ऑगस्ट रोजी अवघ्या 8 महिन्यांमध्ये तो पुतळा कोसळला, ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. त्यामुळे संबंधित पुतळा उभारणारे ठेकेदार, पुतळ्याला परवानग्या देणाऱ्या शासकीय आस्थापना व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्यामुळे भविष्यात अशा घटना होणार नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्र ही महापुरुषांची भूमी असून त्यांचे पुतळे आणि स्मारके हे सर्वसामान्यांसाठी त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे प्रेरणास्थान आहेत. परंतू जर अवघ्या 8 महिन्यांमध्ये एखाद्या पुतळ्याची ही अवस्था होत असेल तर 50-60 वर्षे जुन्या पुतळ्यांचे अस्तित्व सुध्दा नक्कीच धोक्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे व स्मारकांचे
रचनात्मक गुणांकन (स्ट्रक्चरल ऑडिट) करून त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात यावी. असे केल्यास भविष्यात पुतळा कोसळण्याच्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही अशी सूचना वजा मागणी केली आहे. यावर काँग्रेसचे मुख्य जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, वरीष्ठ जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक महबूब पटेल, धाराशिव तालुकाध्यक्ष विनोद वीर, धाराशिव शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, बाजार समितीचे संचालक उमेशराजे निंबाळकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सिद्धार्थ बनसोडे, महीला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शीलाताई उंबरे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, अल्पसंख्याकचे आयुब पठाण, मानवाधिकार विभागाचे जिल्हा सरचिटणीस अशोक बनसोडे, अभय वीर, सौरभ गायकवाड, संजय गजधने, सुनील बडूरकर, आनंद बनसोडे, वसंत मडके यांच्या सह्या आहेत.