तुळजापूर (प्रतिनिधी) -शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन व इतर अनुदान व सार्वजनिक बांधकाम विभागाचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी राज्याच्या मुख्य सचिवाकडे निवेदन देऊन केली आहे.

निवेदनात म्हटलं आहे की, राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी मोठया प्रमाणात अडचणीत सापडलेला आहे. तसेच शेतकऱ्यांचे सन 2020 पासून अर्धवट विमा मिळालेला आहे. तसेच तुळजापूर तालुक्यामध्ये सन 2023 चा विमा फक्त 5% लोकांना मिळालेला आहे. उर्वरीत विमा शेतकऱ्यांनी अँड्राईड मोबाईलवर तक्रार जिओ टॅकींग करुन नोंदविलेली नसल्यामुळे देण्यात आलेला नाही. शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत बिकट असून शेतकऱ्यांकडे मोबाईल घ्यायला पैसा कुठून येणार आहे. या अगोदर सन 2014 ला बँकेत विम्याचा पैसा भरल्यानंतर शेतकऱ्याने त्याची तहसिलदार व तालुका कृषि अधिकारी यांच्यामार्फत चौकशी व्हायची व त्यानुषंगाने शेतकऱ्याला एकरकमी विमा एप्रिल, मे महिन्याच्या दरम्यान मिळायचा. त्यामुळे शेतकऱ्यांना कधीही सावकाराकडे कर्ज मागणीची वेळ येत नव्हती व आत्महत्या अत्यंत अल्प होत होत्या. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे जवळपास 80 हजार कोटीचे देयके प्रलंबीत असून त्यामुळे शासकीय ठेकेदाराला आत्महत्येची वेळ आलेली आहे. बँका त्यांची प्रॉपर्टी जप्ती करुन लिलाव करत आहेत. तरी याचा गंभीर विचार करून शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन व इतर अनुदान व सार्वजनिक बांधकाम विभागाचा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा यासंदर्भामध्ये आपण अप्पर मुख्य सचिव, वित्त व नियोजन यांना निर्देश द्यावेत, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष धैर्यशिल पाटील यांनी दिले.

 
Top