धाराशिव (प्रतिनिधी)- एमएस फिटनेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “उस्मानाबाद श्री“ शरीर सौष्ठव स्पर्धेला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सरफराज कुरेशी याने “उस्मानाबाद श्री“ चा बहुमान पटकावला. तर नवाज काडबे याने व्दितीय क्रमांक मिळविला.

तरुणांना सुदृढ, निरोगी शरीर व व्यायामाचे महत्त्व कळावे, त्यांनी व्यसनापासून दूर राहावे याकरिता धाराशिव येथील अझहर पठाण, प्रवीण केसकर यांच्या वतीने शरीरसौष्ठव (बॉडी बिल्डींग) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस  निरीक्षक श्री. शेख, समाजसेवक मसुद शेख, इस्माईल शेख, गफार शेख, माजी नगरसेवक अफरोज पिरजादे यांच्या हस्ते करण्यात आले. अझहर पठाण व प्रवीण केसकर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत 50 पेक्षा अधिक तरुणांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत सरफराज कुरेशी याने “उस्मानाबाद श्री“ चा बहुमान पटकावला. तर नवाज काडबे याने व्दितीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र, मेडल व रोख बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. परीक्षक म्हणून सोलापूर जिल्हा बॉडीबिल्डिंग व फिटनेस असोसिएशनचे सचिव  प्रमोद काटे, जॉईंट सेक्रेटरी नझिर शेख, शकील बडेकर, उस्मानाबाद जिल्हा बॉडी बिल्डिंग व फिटनेस असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी, सचिव राहुल बचाटे यांनी काम पाहिले.

प्रारंभी मान्यवरांचे स्वागत व सत्कार अझहर पठाण, प्रवीण केसकर वतीने करण्यात आला. पहिल्याच वर्षी “उस्मानाबाद श्री“ शरीरसौष्ठव स्पर्धेला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहून यापुढे दरवर्षी ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे आयोजक अझहर पठाण व प्रवीण केसकर यांनी जाहीर केले. स्पर्धा पाहण्यासाठी शहरातील तरूण, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top