धाराशिव (प्रतिनिधी)- महायुती सरकारने धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात इतिहासात सर्वात जास्त विकास कामे मंजूर करत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून गावातील प्रमुख कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मेंढा ता. धाराशिव येथे सुमारे 2 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या उद्घाटन व भूमिपूजन प्रसंगी बोलताना केले.
आ. राणाजगजितसिंह पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, राज्यात जाती धर्मावर राजकारण करून जाती जातीत भांडणे लावून तेढ निर्माण करत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून केला जात आहे.
यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की, जिल्ह्याच्या अर्थकरणाला चालना देण्यासाठी पर्यटन क्षेत्रात मोठा वाव असून तुळजापूर तीर्थक्षेत्राचा मोठा विकास करायचा आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्र महामार्गाने जोडलेले असून भाविकांना रेल्वेने देखील येथे येता यावे, याकरिता केंद्र व राज्य सरकारने आवश्यक तो निधी मंजूर केला आहे. त्याचेही काम जलद गतीने चालू आहे. आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणारे भाविक किमान एक-दोन दिवस तुळजापूर मध्ये राहतील, येथे पर्यटन करतील व त्या माध्यमातून येथील उत्पन्न वाढेल, अर्थकारण सुधारेल यासाठी काम सुरू आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास व जिल्ह्याच्या समृद्धीसाठी माझे मनापासून प्रयत्न चालू असल्याचे यावेळी बोलताना ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोकराव पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, नामदेव माळी, नागनाथ पवार, तानाजी गायकवाड, रुक्मीन विठ्ठल घुले, अशोकराव पाटील, शिवाजी माळी, अरुण शेटे, बाबा जावळे, तानाजी जावळे, मेंढा ग्रामपंचायतचे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयराम ढोरमारे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.