धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील चारही विधानसभा निवडणूक मतदार यादीबाबत ज्या मतदारांचे नावे वगळलेली आहेत किंवा नावे चुकीलेली आहेत याबाबत मतदार यादीवर आक्षेप नोंदविण्याची 20 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
बुधवार दि. 7 ऑगस्ट रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेस उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव हे उपस्थित होते. अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीबाबत 29 ऑगस्टपर्यंत मतदार यादी चेक करून 30 ऑगस्टला मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. नवीन मतदारांची नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू राहिल. जिल्ह्यात 20 मतदान केंद्र वाढले असून, एकूण मतदान केंद्राची संख्या 1523 आहे. 6 ऑगस्टपर्यंत धाराशिव जिल्ह्यात उमरगा 3 लाख 11 हजार 161 मतदार, तुळजापूर 3 लाख 77 हजार 22 मतदार, उस्मानाबाद 3 लाख 68 हजार 4 मतदार तर परंडा 3 लाख 25 हजार 796 मतदार या प्रमाणे मतदारांची संख्या आहे. लोकसभा निवडणूक 2024 मधील मतदारांपेक्षा 4 हजार 602 मतदारांची वाढ आहे. सर्व राजकीय पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी वाढविणे आवश्यक आहे असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.
याचिकेमुळे मतदान मशीन अडकल्या
लोकसभा निवडणुकीबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएम मशीन सध्या सील बंद आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी 2600 ईव्हीएम मशीन बाहेरून मागविण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी मशीनमध्ये ऐनवेळी काही बिघाड झाल्यास 130 टक्के ईव्हीएम मशीन राखीव ठेवण्यात आल्या आहेत असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.