धाराशिव (प्रतिनिधी)- गोवंशाच्या जतन आणि संवर्धनासाठी गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून जिल्हा, तालुका व गाव पातळीवर गोरक्षण समित्यांची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा गोसेवक वैद्य नवनाथ दुधाळ यांनी केली.
कळंब तालुक्यातील दुधाळवाडी (पांडववाडी) येथे वैद्य नवनाथ दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि 15 ऑगस्ट 2024 रोजी गोसंसद व जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. यावेळी वैद्य नवनाथ दुधाळ बोलत होते. गोसंसदेस सोलापूर येथील ज्येष्ठ गोसेवक विलासभाई शहा, गोसांसद स्वामी इंजेलियन, सुवर्णा यादव, हभप अरुण शाळू महाराज, अंबादास देशपांडे, शहाजी जाधव, खंडेश्वर लोकरे, आप्पा खरडकर, बाळासाहेब दुधाळ, अकबर शेख, रघु मीर, औदुंबर अवधूत, गुरुनाथ दुधाळ, बालाजी लाटे, अभंग गंगथडे, बाळू कांबळे,अमोल चव्हाण व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना वैद्य दुधाळ म्हणाले की, जगदगुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या अधिपत्याखाली पाच दिवसीय गोसंसद नुकतीच नवी दिल्ली येथे पार पडली. यामध्ये आपण गोसंसद पदाची शपथ देऊन मंत्रिमंडळामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यासह राज्यभरामध्ये गोवंश जतन आणि संवर्धन करण्यासाठी दुधाळ यांनी चळवळ उभी केली आहे. त्याअनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रातील गावागावात जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर गोरक्षण समित्यांची स्थापना करण्यात येत आहे. इच्छुक गोरक्षकांनी आपापल्या गावात समित्यांचे गठण करुन कार्यकारिणीची यादी आपल्याकडे द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर संपूर्ण देशामध्ये गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी व्हावी,गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा,गो संवर्धनासाठी प्रत्येक गाईंना प्रतिदिन 100 रुपये प्रमाणे 3000 रुपये महिना शासनाकडून मानधन मिळावे, गोवंशाच्या निर्मित उत्पादनावरील जीएसटी बंद करण्यात यावी, गायरान जमिनीचा वापर गोवंश चाऱ्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा, यासह अन्य इतर विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.
यापुढे गायींना प्रतिदिन 100 रुपये अनुदान मिळणार असल्यामुळे यापुढे गायी कत्तलखान्यास जाण्यापासून वाचतील. गोरक्षणाच्या विषयावर आम्ही लोकसभा निवडणूक लढविली. अपेक्षित मतदान मिळाले नसले तरी गोमातेच्या संरक्षणाचा विषय आम्ही जनतेसमोर मांडला. आगामी विधानसभा निवडणुकीत इच्छुकांनी गोरक्षणाच्या प्रश्नावर निवडणूक लढवावी. त्यासाठी सर्व गोरक्षक आपल्या पाठीशी उभे राहतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले.
या गोसंसद आणि जिल्हास्तरीय बैठकीस धाराशिवसह लातूर, बीड, नांदेड, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे, नगर जिल्ह्यातील गोरक्षक, गोसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.