धाराशिव (प्रतिनिधी)- सोलापूर - तुळजापूर - धाराशिव रेल्वे मार्गाच्या एकुण 110 किमी लांबी पैकी धाराशिव ते तुळजापूर या 41.4 किमी लांबीच्या रेल्वे लाईनच्या कामाची रु. 487 कोटींची निविदा अंतिम झाली असून कंत्राटदाराला नियुक्ती आदेश देऊन 01 सप्टेंबर पासून काम करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीमध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी संबंधित कंत्राटदार व रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आमदार राणजगजितसिंह पाटील यांच्या विनंतीवरून जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी या कामाचा आढावा घेण्यासाठी रेल्वे विभागाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदाराची बैठक बोलाविली होती. सोलापूर-धाराशिव रेल्वेमार्गाच्या कामाचा कालावधी 5 वर्षावरून अडीच वर्षे करण्यासाठी या कामाचे तीन भाग करण्यात आले असून पहिल्या भागाची निविदा अंतिम झाली असून दुसऱ्या भागाच्या निविदेची छाननी प्रक्रिया सुरू आहे. सदरील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून कार्यारंभ आदेश देण्याच्या सुचना देखील या बैठकीमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कंत्राटदारांनी रेल्वे मार्गाच्या जागेची पाहणी केली असून जवळपास 95 टक्के जमीनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्णत्वास येत आहे.
या रेल्वे मार्गामुळे धाराशिव येथे जंक्शन होणार असून आई तुळजाभवानीचे तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडले जाणार आहे. त्यामुळे या भागातील पर्यटनाला नवी दिशा मिळणार असून रोजगार निर्मिती व अर्थकारणाला मोठी चालना मिळणार आहे. सदरील बैठकीस प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव, उपविभागीय अधिकारी संजय ढवळे, तहसिलदार मृनाल जाधव, रेल्वे विभागाचे उपमुख्य अभियंता बनसोडे, सहाय्यक कार्यकारी अभियंता मस्के, अभियंता नुर, यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.