धाराशिव (प्रतिनिधी)-रक्षाबंधन हा सण ‘रक्षा' आणि ‘बंधन' या दोन शब्दांनी बनलेला असून संस्कृत भाषेनुसार या सणाचा अर्थ ‘संरक्षण करणारे बंधन' असा होतो. येथे रक्षा म्हणजे संरक्षण प्रदान करणे आणि बंधन म्हणजे गाठ, संरक्षण देणारी तार. याच पार्श्वभूमीतून बालगृहातील कोणाला चालता येत नाही, कोणाला नीट बोलता येत नाही, जन्मत:च मानसिक अंपगत्व लाभलेल्या शेकडो अनाथ भगिनींना जन्मदात्यांनी वाऱ्यावर सोडून दिले. तरीही मोठ्या कल्पक आणि उत्साही असलेल्या या दिव्यांग भगिनींनी पोलीस अधीक्षकांनाच आपला भाऊ मानले. मेठ्या कल्पकतेतुन वेगवेगळ्या झाडांच्या बियांचा वापर करुन बनविलेल्या राख्या पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधवही भारावून गेले. स्वाआधार संस्थोतील दिव्यांग अनाथ मुलींसोबत हे रक्षाबंधन अविस्मरणीय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातील आळणी येथील स्वाआधार मतिमंद मुलींच्या निवासी प्रकल्पात पर्यावरणपुरक रक्षाबंधन कार्यक्रम दि. 19.08.2024 रोजी आयोजीत करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. संजय जाधव साहेब जिल्हा पोलीस अधिक्षक धाराशिव, यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, धाराशिव (ग्रा.) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक- श्री मारुती शेळके संस्था प्रमुख मा. श्री. शहाजी चव्हाण, मा. श्री. गुरुनाथ थोडसरे (मुख्याध्यापक),संस्थेच्या सल्लागार समितीचे कार्याध्यक्ष श्री. रवींद्र केसकर, पत्रकार शितल वाघमारे आदीची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी अनाथ दिव्यांग मुलींनी मोठ्या उत्साहात स्वागत गीत सादर करुन उपस्थितांना प्रभावित केले. त्यांनतर खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे या गीतावर उत्कृष्ट सादरीकरण करीत दिव्यांग मुलींनी त्यांच्या ठायी असलेल्या कलागुणांचे दर्शन घडविले. वेगवेगळ्या वृक्षांच्या बियांपासून बनविण्यात आलेल्या राख्यांचा वापर मागील दहा वर्षापासून या संस्थेत केला जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव यांना राखी बांधून दिव्यांग मुलींनी औक्षण केले. हा क्षण भारावून टाकणारा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी यावेळी व्यक्त केली. सर्व शासकिय सोपस्कर बाजूला सोडून पोलीस अधीक्षकही मुलींसोबत जमीनीवरबसून गंप्पामध्ये रमले होते. त्यांच्या हस्ते मुलींना शालेय साहित्य व खाउुचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक गुरुनाथ थोडसरे यांनी केले. सुत्रसंचालन व आभार रुपाली कांबळे यांनी व्यक्त केले.