धाराशिव (प्रतिनिधी) - हिंदू मुस्लिम सामाजिक सलोखा राहावा यासाठी सातत्याने दोन्ही समाज प्रयत्न करीत असतात. याचाच भाग म्हणून हिंदूंचा सण गणेशोत्सव सप्टेंबरमध्ये असून दि.१७ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. तर दि.१६ सप्टेंबर रोजी हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती आहे. त्यामुळे पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक दि.१९ सप्टेंबर रोजी काढण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय ईद ए मिलाद जुलूस कमिटीच्यावतीने घेण्यात आला असल्याची माहिती जुलूस कमिटीचे अध्यक्ष सय्यद खलील यांनी दिली आहे.
इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म दिवस दि.१६ सप्टेंबर रोजी येत आहे. तर गणेश विसर्जन दि.१७ सप्टेंबर रोजी आहे. मिरवणूक मार्गात गणपती मंडळाचे शेड, विद्युत रोषणाई व देखावे असतात. मिरवणुकीची गर्दी व देखावे यात काही अनुचित घटना घडून शहराची शांतता, बंधुभाव व एकात्मता अबाधित राखण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे ईद ए मिलाद जुलूस कमिटी व सर्व मौलाना यांनीही बैठक घेऊन मिरवणूक (जुलूस) दि. १९ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तर धार्मिक कार्यक्रम हे ठरल्या प्रमाणे दि.१६ सप्टेंबर रोजीच कराण्याचे ठरले आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जुलूस कमिटीचे अध्यक्ष सय्यद खलील यांनी केले आहे.
या बैठकीस उपाध्यक्ष आमेर पठाण, शहाबाज पठाण, सचिव कलीम कुरेशी, कोषाध्यक्ष नीहाल शेख, वाजीद पठाण, बिलाल तांबोळी, अफरोज पिरजादे, खलिफा कुरेशी, गफार भाई शेख, कादर खान पठाण, मौलाना जाफर अली खान, खारी मोहम्मद इस्माईल, मौलाना अफजल निजामी, मौलाना शेख अस्लम, मौलाना अब्दुल हाफीज, हाफिज तौफिक पठाण, मोहम्मद इर्शाद कुरेशी आदी उपस्थित होते.