भूम (प्रतिनिधी)- माणसाची सवय माणूसकि मिळवून देते, कांहि सवय जीवन संपवते. आपण कोणती सवय लावावी याचा गांभिर्याने विचार करावा असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी महादेव आसलकर यांनी व्यसनमुक्ती केंद्रातील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना केले.

मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी कै. विलास शंकरराव रोकडे फाउंडेशनच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या स्वस्थ मानस व्यसन व पूनर्वसन केंद्राचा दुसरा वर्धापन दिन येथील एमआयडिसी येथील केंद्रामध्ये साजरा केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी होते. दरम्यान हभप अरुण शाळू, सतिश कदम महाराज,  निवृत्ती अधिकारी चत्रभूज पाखले,  ब्रह्मकुमारी राजश्री दिदी, संजिवन सातपुते, डॉ.डोंबाळे,  कोष्टी समाज ट्रस्ट अध्यक्ष विठ्ठल बागडे  यांची उपस्थिती होती.

वर्धापन दिनाच्या निमित्ताने भूम तालुक्यातील सर्व पत्रकारांनी व्यसनमुक्ती केंद्राला वेळोवेळी सहकार्य केल्याच्या निमित्ताने पत्रकारांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असलेले अधिकारी यांनी स्वतः आजपासून व्यसनमुक्त होत असल्याचं पांडुरंगाची चंदनाची माळ घालून सर्वांसमक्ष जाहीरपणे वचन दिले.  या कार्यक्रमातून खूप काही घेण्यासारखे आहे, देण्यासारख आहे असेही वक्तव्य अनेकांनी केले.     कार्यक्रमासाठी व्यसनमुक्ती केंद्र संचालक नवनाथ रोकडे, शाम वारे, श्याम बागडे, आशिष बाबर, योगेश आसलकर, माजी नगराध्यक्ष जिजाबाई रोकडे आदिती परिश्रम घेतले.

 
Top