धाराशिव (प्रतिनिधी) - शेतकऱ्यांचे सोयाबीन व हरभरा योग्य भावात खरेदी केले. वायदे बाजार दरानुसार 15 दिवसांत बिल देणार असल्याची शेतकऱ्यांना थाप मारली. मात्र दोन वर्षाचा कालावधी लोटला तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे रक्कम दिलेली नाही. हे फसवणुकीचे कारस्थान अनंत छाया ऍग्रो प्रोडूसर कंपनीच्या संचालकांनी केले आहे. संबंधित शेतकरी कंपनीकडे बिलासाठी उंबरठे झिजवीत आहेत. मात्र संबंधित संचालक शेतकऱ्यांना आश्वासन देऊन झुलविण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या सर्व संचालकावर फौजदारी कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी रत्नापूर, कडकनाथवाडी, वाघोली, उपळाई, उक्कडगाव व मलकापूर आदी गावच्या शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या नियोजनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव शहरातील एमआयडीसीमध्ये असलेल्या अनंत छाया अग्रो प्रोडूसर कंपनी लि. च्या संचालकांनी डिसेंबर 2022 ते 2023 या दरम्यान जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन आम्ही तुमचे सोयाबीन व हरभरा योग्य भावात खरेदी करतो. वायदे बाजारानुसार 15 दिवसांमध्ये त्या मालाचे बिल तुम्हाला दिले जाईल, अशी थाप मारून त्यांच्याकडून खरेदी केला. मात्र अद्यापपर्यंत या कंपनीने या शेतकऱ्यांना बिलाची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे त्यांची फसगत झाल्याचे लक्षात आले असून त्यांनी पोलीस अधीक्षकाकडे धाव घेत कंपनीच्या सर्व संचालकावर फौजदारी गुन्हे दाखल करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. फसगत झालेल्या शेतकऱ्यांमध्ये अतुल मुळे, ज्योती मुळे, स्वाती मुळे, चंद्रकांत जाधवर, मनसुख सय्यद, वैशाली माळी, सिद्धेश्वर पंचवीसे, वसंत धालगुडे, श्रीकांत मनगिरे, संतोष लोमटे, उमेश मगर, भालचंद्र पिंगळे, कैलास क्षीरसागर, औदुंबर क्षीरसागर, मनोज शेळके, सुरेश पाटील, रामेश्वर शेंडगे, सिद्धेश्वर पौळ, आश्रुबा मुंडे, पांडुरंग मुंडे, विलास शेंडगे, राजाराम शेंडगे, रामलिंग मुंडे, नागाप्पा मुंडे, रामदास मुंडे, बालाजी दराडे, बळीराम गिराम, नागनाथ मुंडे, भीमराव वाघ, गहिनीनाथ दराडे, सुरेश दराडे, गोकुळ दराडे, पांडुरंग बारकुल, अंबऋषी बारकुल, आप्पाराव दराडे, दगडू धुमाळ, वसंत धालगडे, सुधीर धालगडे, आबाराव धालगडे, ज्ञानेश्वर वाळके आदींसह 51 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

 
Top