वाशी (प्रतिनिधी)- मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलन मागणीला पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधुन आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (दि.01) येथील तहसिल कार्यालयावर भव्य ट्रँक्टर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शेकडो ट्रँक्टरसह हजारो नागरिक सहभागी झाले होते. मागण्या संदर्भात निवेदन तहसिलदार राजेश लांडगे यांच्या द्वारा शासनाला देण्यात आले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधुन आरक्षण देण्यात यावे, सगेसोयरेचा अध्यादेश तात्काळ काढून त्याची अंमलबजावणी करावी, आंदोलन काळात मराठा युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, कुणबी नोंद सापडलेल्या नागरिकांना तात्काळ प्रमाणपत्र वाटप करण्यात यावेत इत्यादी मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
जरांगे पाटील यांना पाठिंबा यासह विविध मागण्यासाठी बावी ता.वाशी येथुन सकाळी आठ वाजता निघालेला ट्रँक्टर मोर्चा तालुक्यातील गोजवाडा, झिन्नर, दसमेगाव मार्गे वाशी शहरातील पारा चौक, छञपती शिवाजी महाराज नगर, छञपती शिवाजी महाराज चौक, लक्ष्मी रोड, कन्हेरी रोड मार्गे दुपारी बारा वाजता तहसील कार्यालयावर धडकला. तहसील कार्यालयात मोर्चा आल्यानतंर सकल मराठा समाजाच्या वतीने प्रशांत चेडे, बालाजी ढाणे यांची भाषणे झाली.