धाराशिव (प्रतिनिधी)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी शहरातील शासकीय दूध शीतकरण केंद्राची एक एकर जागा राज्य सरकारने मंजूर केली आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनीच जागा मंजूर केल्याचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षां पासून प्रलंबित असलेले अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकारले जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याकरिता धाराशिव शहरातील शासकीय दुध शितकरण केंद्राची जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. राज्य सरकारने गुरुवारी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी ऐतिहासिक निर्णय घेत शासकीय दूध शीतकरण केंद्राची एक एकर जागा महसुल व वन विभागाकडे प्रत्यार्पीत करण्याचा शासन निर्णय घेतला. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व महायुती सरकारचे आमदार पाटील यांनी आभार मानले. 

लोकशाहीर अण्णाभाऊंचे कार्य समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या या अनमोल कामात थोडेसे योगदान देण्याची संधी यानिमित्ताने आपल्या वाट्याला आली असल्याचे समाधान आमदार पाटील यांनी व्यक्त केले आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येलाच हा शासन निर्णय निर्गमीत करण्याचे प्रयत्न होते. गुरुवारी मुंबईत थांबुन अण्णाभाऊ साठे यांना शासन निर्णयाच्या माध्यमातून अभिवादन करता आले असे ते म्हणाले.

 
Top