धाराशिव  (प्रतिनिधी)- केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना,उपक्रम, अभियान व मोहिमा आहेत.जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी योजना,उपक्रम,मोहिमा व अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सूक्ष्म नियोजनातून यंत्रणांनी काम करावे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी,अधिकारी- कर्मचारी यासह सर्वांनी एकत्र येऊन काम करूया.असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी केले.

15 ऑगस्ट रोजी 78 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगावकर, बुबासाहेब जाधव, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील,जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत पुढे म्हणाले, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पुरोगामीत्वाचा वारसा जपत महाराष्ट्राने महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल सुरू केली आहे. प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन योजनेअंतर्गत 50 खाटांचे क्रिटिकेअर युनिटच्या बांधकामासाठी 23 कोटी 75 लक्ष रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. 361 कोटी रुपये निधीतून 500 खाटांचे जिल्हा रुग्णालय बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खरीप हंगाम 2023 च्या दुष्काळात बाधित 1 लाख 22 हजार शेतकऱ्यांना 145 कोटी 13 लाख रुपयांचा निधी त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात आल्याचे सांगून प्रा.डॉ.सावंत म्हणाले की,ई-पीक पाहणी प्रकल्प जिल्ह्यात राबविला जात आहे. जिल्ह्यातील 700 रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले.या शेतरस्त्यांचा 17 हजार शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील 653 किलोमीटरचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आल्याचे प्रा.डॉ.सावंत यांनी सांगितले.

ध्वजारोहणानंतर पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र वाहिली. पोलीस बँड पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक,ज्येष्ठ नागरिक,माजी सैनिक,विविध विभागाचे अधिकारी - कर्मचारी,नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन पडवळ यांनी केले.

 
Top