धाराशिव (प्रतिनिधी)- कुटुंबातील सदस्यांचे अशक्तपणा, हिमोग्लोबीनची कमतरता आणि स्थूलपणा कमी करण्यासाठी नियमित ज्वारी, नाचणी, वरी, राळा यासारख्या भरड धान्यापासून बनविण्यात येत असलेल्या खाद्यपदार्थांचा नियमित आहारात समावेश करावा. यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषणमूल्य आहे, निरोगी व सुदृढ कुटुंब बनवावे असे प्रतिपादन तहसीलदार गोविंद येरमे यांनी केले.

केंद्रीय संचार ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय सोलापूर व महिला आर्थिक विकास महामंडळ धाराशिव यांच्या वतीने शांताई मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय पोषण अभियान व आहारात भरड धान्यांचा समावेश या विषयावर आयोजित मल्टिमीडिया प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार येरमे बोलत होते.

यावेळी तालुका कृषी अधिकारी डीबी रितापुरे, सहाय्यक प्रचार अधिकारी अंबादास यादव, जिल्हा समन्वयक अधिकारी शोभा कुलकर्णी, बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापक योगेश कंदले, नायब तहसीलदार किशोर कुलकर्णी, व्यवस्थापक किशोर टोम्पे, ज्ञानदीप लोकसंचलित साधन केंद्राचे अध्यक्ष जगदेवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे ज्वारी, नाचणी, मका, वरी, राळा, कोदो यासारखे पीक अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. भरड धान्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारकडून मागील दोन वर्षापासून शेतकरी आणि सामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असल्याचे श्री येरमे यांनी सांगितले. प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना आणि मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनांचा लाभ घेऊन महिला बचत गटांनी अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रात पुढाकार घ्यावा,असे आवाहन डी बी रितापुरे यांनी केले. महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कडून राबवन्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी शाखा व्यवस्थापक योगेश कंदले यांनी दिली.

शोभा कुलकर्णी यांनी माविम कडून महिला बचत गटासाठी राबवण्यात असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबादास यादव यांनी केले. सूत्रसंचालन किशोर टोंपे व सखु सोनकांबळे यांनी केले. आभर पांडुरंग गायकवाड यांनी केले. ज्ञानदीप लोकसंचालित साधन केंद्र यांची 11 वी वार्षिक सर्वसाधारण सभा यावेळी घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन आणि इतनी शक्ती हमे देना दाता या प्रार्थनेने करण्यात आले.

प्रदर्शनाच्या अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालय कडून 110 लोकांचे हिमोग्लबिन, ब्लड प्रेशर, शुगर, सीबीसी आणि एचआयव्हीची तपासणी करण्यात आली. महिला बचत गटाकडून भरड धान्यापासून बनवण्यात आलेल्या आहार प्रात्यक्षिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि भारत विद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. बचत गटाकडून विविध घरगुती उपयोगात येणाऱ्या वस्तूंचे विक्री स्टॉल  लावण्यात आले होते. सदर प्रदर्शन 31 व 1 सप्टेंबर 2024 पर्यंत सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुले असणार आहे.

कार्यक्रमासाठी समन्वयक संयोगिनी महानंदा अंगबरे, सखु सोनकांबळे, अयोध्या बनसोडे, राणी मोरे, शिल्पा दिक्षित, स्वालेहा मुल्ला, छाया शिंदे, सुनिता पाटील, सुरेखा पाटील, संगिता मुळे, छाया कांबळे, अनिता शिंदे, कमल सास्तुरे, अनुसया जाधव, संगिता सोनकांबळे,महादेवी माळी, सुरज जाधव आणि साईराज राऊळ यांनी परिश्रम घेतले.

 
Top