धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव-कळंब मतदारसंघ हा शिवसेनेच्या धनुष्य बाणाचा मतदारसंघ आहे. महायुतीमध्ये धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे सुटेल. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलूनच आपण शिवसेनेत आलो आहे. असे सुधीर पाटील यांनी गुरूवार दि. 1 ऑगस्ट रोजी सांयकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजपचे धाराशिव येथील नेते आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी मंगळवार दि. 30 जुलै रोजी रात्री उशीरा शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला. प्रवेशानंतर त्यांनी आपण स्वगृही परतलो, अशी भावना व्यक्त केली. त्यांच्यासोबत त्यांचे सुपूत्र अभिराज पाटील तसेच निवडक पदाधिकारी उपस्थित होते.
सुधीर पाटील यांनी काही वर्षापूर्वी शिवसेनेतून भाजपामध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेत जिल्हाप्रमुख पदावर असताना त्यांनी पक्षाला मोठी ताकद दिली होती. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, शेतकरी कर्जमाफीसाठी अचलबेट ते सोनारी पायी दिंडी काढली होती. तसेच तेरणा नदी खोलीकरण आदी सामाजिक कामासोबतच शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेवून आधार दिला होता.
पूर्वी आपण 25 वर्ष शिवसेनेत काम केले आहे. त्यामुळे आजचा प्रवेश म्हणजे घरवापसी असल्याचेही सुधीर पाटील यांनी सांगितले. धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला लाभदायक आहे. त्यामुळेच आपण शिवसेनेत आलो असून, विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचेही सांगितले.